Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचं सध्या सर्वत्र कौतुक होतं आहे. मराठी कलाकारांसह राजकारणातील दिग्गज मंडळी सूरजचं कौतुक करताना दिसत आहेत. पण दुसऱ्याबाजूला अनेकजण नाराज आहेत. सहानुभूतीमुळे सूरज जिंकला असं म्हणत टीका करत आहेत. याच टीकाकारांना अभिनेते आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी किरण माने यांनी आपल्या पोस्टमधून जबरदस्त उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतीच किरण माने यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. सूरज चव्हाणचा ‘बिग बॉस’ची ट्रॉफी हातात घेतलेला फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, “मराठी मनोरंजन क्षेत्रात यश, पैसा, प्रसिद्धी हे कुणाला मिळावं याची गणितं आपल्या डोक्यात फिट्ट करून दिली गेलेली आहेत. टीव्ही रिॲलिटी शोमध्ये लायक नसूनही एखाद्या शहरी, गोर्‍यापान, चलाख पोराला ट्रॉफी दिली की बहुतांश लोकांना फारसं आश्चर्य वाटतं नाही…म्हणजे ‘तो विनर नव्हताच’ वगैरे ट्रोलिंग होतं. पण ‘होता है, चलता है’ असं वाटून विषय संपतो…पण गरीब, ओबडधोबड, गावरान, भाबड्या माणसानं ट्रॉफी उचलली की लै गदारोळ होतो. ‘गरीबी बघून सहानुभूतीनं त्याला हे दिलंय’, ‘त्याला हे यश टिकवताच येणार नाही’ अशा टिप्पण्या सुरू होतात. ‘आता दारिद्र्य दाखवून रडारडी करा आणि ट्रॉफी मिळवा’ अशी हेटाळणी केली जाते. मनोरंजनाच्या गोर्‍यापान, चकचकीत, झगमगीत विश्वात असा फाटका माणूस लोकांना ‘उपरा’ वाटतो. सूरज चव्हाणविषयी जे निगेटिव्ह बोललं जातंय त्याचं मूळ कारण हे आहे.”

हेही वाचा – “जर तसं झालं नसतं तर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची विजेती मी असते”, जान्हवी किल्लेकरचं विधान, म्हणाली…

पुढे किरण मानेंनी लिहिलं, “एक विसरू नका भावांनो, सूरज ‘बिग बॉस’च्या घरात मुळात स्वबळावर आला. बिग बॉसच्या ऑफरला सुरुवातीला ‘नाही’ म्हणणारा तो एकमेव स्पर्धक होता हे ही लक्षात घ्या. इतर स्पर्धकांसारखा पैशानं मजबूत वगैरे नव्हता किंवा मनोरंजन विश्वातला नव्हता. अशा पोरानं मिळालेल्या संधीचं सोनं केलंय हे सत्य मान्य करा. अनेकांनी अशी टीका केलीय की सूरज खेळलाच नाही. तर ‘बिग बॉस’ हा ‘टास्क’ जिंकण्याचा खेळ नाही. ‘बिग बॉस’ हा विपरित परिस्थितीतल्या तुमच्या वागण्या-बोलण्यातनं प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा खेळ आहे. म्हणून तर हिंदी-मराठीत काही अशीही उदाहरणं आहेत की ट्रॉफी उचललेल्या कित्येकांना लोक विसरून गेले…पण मनं जिंकलेले कित्येक लोक प्रेक्षकांच्या काळजात आहेत. अठरा वर्षांपूर्वी ‘बिग बॉस’ हिंदीचा पहिला सीझन राहुल रॉयनं जिंकला होता. पण त्यात प्रेक्षकांना भावलेली राखी सावंत आजही एंटरटेनमेंट क्विन आहे आणि रवि किशन भोजपुरीत सुपरस्टार आहे. सूरज ट्रॉफी जिंकला नसता तरी एवढाच लोकप्रिय असता.”

“यश-प्रसिद्धी मिळवायला तुमच्याकडे ‘टॅलेन्ट’ पाहिजे, अंगी ‘कर्तृत्व’ पाहिजे आणि ‘संधी’ मिळाली पाहिजे. या तिन्हीत सूरज यशस्वी ठरला. आता हे यश आणि प्रसिद्धी टिकवण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत लागते… ती दाखवली तर तो टिकेलही. किमान आता तरी मराठी इंडस्ट्रीच्या तळ्यात पोहोणार्‍या बदकांमध्ये गाव खेड्यातनं नितळ-निर्मळपणा घेऊन स्वबळावर आलेल्या पिल्लाला ‘कुरूप वेडा’ ठरवू नका. कदाचित आतापर्यंतच्या कॉमेडियन्स, परफॉरमर्स, एंटरटेंनर्सना बुक्कीत टेंगुळ आणणारा तो एक ‘राजहंस’ ठरू शकतो. लव्ह यू सूरज… होऊन जाऊदे झापुक झुपूक,” असं किरण मानेंनी लिहिलं आहे.

दरम्यान, सूरज चव्हाणला ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीसह १४.६ लाखांचा धनादेश बक्षीस स्वरुपात मिळाला आहे. सूरज या पैशांचा वापर घर बांधण्यासाठी करणार आहे, असं त्याने माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 kiran mane answer to those who criticized suraj chavan for winning pps