Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. आता अंतिम आठवडा सुरू होणार आहे. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर या आठ सदस्यांमधील एक सदस्य ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरणार आहे. याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहेत. सध्या रितेश देशमुख शिवाय ‘भाऊचा धक्का’ पार पडत आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात कामानिमित्ताने रितेश परदेशात असल्याने ‘भाऊच्या धक्क्या’वर गैरहजर आहे.
शनिवारी ( २८ सप्टेंबर ) ‘बिग बॉस’च्या घरात आधीच्या पर्वातील गाजलेले सदस्य खास पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील अभिजीत बिचुकले, पहिल्या पर्वातील पत्रकार अनिल थत्ते आणि चौथ्या पर्वात गाजलेली राखी सावंत हे खास पाहुणे म्हणून घरात पाहायला मिळाले. यावेळी या पाहुण्यांनी काही सदस्यांचं कौतुक केलं तर काही सदस्यांवर टीका केली. पण यामुळे ‘बिग बॉस’चा शनिवारचा भाग आणखी रंगतदार झाला. अशातच घरात शाब्दिक वाद झाल्याचं समोर आलं आहे. याचं कारण आहे सूरज.
हेही वाचा – “मला कुठलाही भयंकर आजार झालेला नाही”, सुशांत शेलारने वजन घटण्यामागचं सांगितलं नेमकं कारण, म्हणाला…
‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडियावर नुकताच प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सूरजला सतत टोचून बोलण्यावरून निक्की आणि अंकितामध्ये शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर अभिजीत आणि पंढरीनाथमध्येही वादाची ठणगी पडली आहे.
प्रोमोमध्ये सूरज टेबलवर सांडलेलं साफ करताना दिसत आहे. याच वेळी अंकिता म्हणते, “खुर्चीवर पण सांडवलं आहेस?” त्यावर निक्की म्हणते, “जाऊ देना किती त्याला टोकायचं आहे.” त्यानंतर अंकिता रागात सूरजला म्हणते, “ती सांगेल ते ऐक.” मग निक्की म्हणते की, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला टोमणा, टोकायचं. तुम्ही त्याला घर देतायत म्हणून त्याच्यावर अत्याचार करू नका. तेव्हा अंकिता म्हणते, “काय?”
त्यानंतर वॉशरुमध्ये अभिजीत आणि पंढरीनाथ सूरजच्या विषयावर चर्चा करताना दिसतात. यावेळी दोघांमध्येही वादाची ठिणगी पडते. अभिजीत पंढरीनाथला म्हणतो, “त्याला सारखं सारखं टोकणं आवडत नाही.” त्यावर पंढरीनाथ म्हणतो, “तू निक्कीच्या मताशी सहमत आहे.” त्यानंतर निक्की म्हणतेय की, तुमचं खरं बाहेर आलं की ते टोचतं.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “निक्की खरंच खूप चांगली आहे. ती सूरजला समजून घेते.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, कुचके पॅडी आणि अंकिता. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “निक्की सूरजची सहानुभूती मिळवण्यासाठी कारस्थान करत आहे.”