सोशल मीडियावर अनेक गोष्टींची चर्चा होताना दिसते. एखाद्या व्यक्तीचे कधी कौतुक, तर कधी त्याला ट्रोलिंग केले गेल्याचेदेखील पाहायला मिळते. अभिनेता रितेश देशमुखदेखील गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सूत्रसंचालनाची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतल्याने तो सातत्याने चर्चेत असतो.

आता कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड व प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकतीच अमोल परचुरे यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बिग बॉस मराठी आणि त्यामध्ये सहभागी झालेले स्पर्धक, यावेळी घराची थीम का बदलली, महेश मांजरेकरांना या पर्वाच्या होस्टिंगची जबाबदारी का दिली नाही, याबरोबरच रितेश देशमुखच्या होस्टिंगबद्दल वक्तव्य केले आहे.

रितेश देशमुखच्या होस्टिंगबाबत काय म्हणाले केदार शिंदे?

रितेश देशमुखच्या होस्टिंगबद्दल बोलताना ते म्हटले, “मला असं वाटतं की, तो पर्सनल जात नाही. पर्सनली अटॅक करीत नाही. गेमबद्दल त्याला जे वाटतंय, जे काही घडतंय, जे चुकलंय आणि जे चांगलंय ते स्पष्टपणे पक्षपातीपणा न करता, सांगण्याचा प्रयत्न करतो. हे मला जास्त बरं वाटतं आणि या वेळेस कर्मधर्म संयोगानं कन्टेस्टंटना बोलता येतंय.

“रितेश बोलायला देतो त्यांना, त्यामुळे त्यांचीपण बाजू कळते. सायकॉलॉजिकली जर विचार केला, तर आठवडाभर त्यांची त्यांचीच गँग असते. म्हणजे भांडलो आपण. १० मिनिटं आपलं कडाक्याचं भांडण झालं; पण पुढच्या अकराव्या मिनिटाला आपण एकमेकांसमोरच आहोत. अशा वेळेस आठवड्यातून दोन वेळा माणूस भेटणार आहे, जो आपल्याबद्दल बोलणार आहे. जो आपण काय केलंय याचा पाढा वाचणार आहे. अशा वेळेस त्यांच्या चुकापण दाखवणारा असावा, त्यांना सांभाळूनपण घेणारा असावा आणि मायेनं त्यांच्या डोक्यावर हात फिरवणारापण असावा. परतदेखील त्यांचा क्लासच घेतला जाणार असेल, तर ते डीमोटिव्हेट होतील.”

पुढे बोलताना ते म्हटले, “आधीच्या सीझनमध्ये हा प्रकार त्यांच्यापर्यंत नीट पोहोचवला गेला नसेल. रितेशभाऊनं ती स्टाईल आणली. नुसतंच त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा मला जी गोष्ट वाटतेय, ती मला स्पष्टपणे बोलता यावी. त्यामुळे आता सोशल मीडियावर लोक दोन्ही पद्धतींनी बोलतात. ज्यांना महेशदादा आवडतो, ते महेशदादाबद्दल बोलतात.”

हेही वाचा: “तिच्यासाठी माझ्या मनात…”, बिग बॉसच्या घराबाहेर येताच निक्कीबरोबरच्या नात्यावर अरबाज पटेलचं भाष्य; म्हणाला, “माझी चूक…”

“आपल्या घरीदेखील लहान मुलांवर आपण रोज चिडत नाही. एकदा चिडतो, दुसऱ्यांदा आपण समजावतो किंवा पहिल्यांदा आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. सतत आरडाओरड करीत नाही. या सगळ्या गोष्टी रितेश सांभाळतो.”

दरम्यान, अनेकदा सोशल मीडियावर महेश मांजरेकर आणि रितेश देशमुख यांची तुलना होताना दिसते. आता बिग बॉस मराठीच्या घरात पुढे काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.