Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh Dhananjay Powar : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची सध्या बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. याआधीच्या चार पर्वांप्रमाणे यंदाच्या पर्वातही स्पर्धकांचे दोन गट पडले असून त्यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. दरम्यान, अभिनेता व या कार्यक्रमाचा होस्ट रितेश देशमुखचा ‘भाऊचा धक्का’ हा एपिसोडही लोकांना आवडू लागला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये रितेशने नेहमीप्रमाणे काही स्पर्धकांची फिरकी घेतली. मात्र रितेशने धनंजय पोवारच्या कपड्यांवरून दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये धनंजय पोवार उर्फ डीपी हा पांढरा सदरा व त्यावर गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान करून आला होता. त्यावरून रितेशने धनंजयची फिरकी घेतली.
धनंजयचं गुलाबी जॅकेट पाहून रितेश म्हणाला, “धनंजय तुमचं जॅकेट फार छान आहे. याचा टेलर बहुतेक बारामतीचा दिसतोय. कारण, ही तिकडची स्टाईल आहे. बारामतीची स्टाईल आता कोल्हापूरपर्यंत आली आहे असं कळतंय. छान दिसताय”.
राज्याचे उपमुख्यमत्री, अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार हे सध्या राज्यभर गुलाबी रंगाचं जॅकेट, गुलाबी रंगाचे जोधपुरी सूट घालून फिरत आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेळावे घेत आहेत. यानिमित्ताने ते राज्यातील महिलांशी थेट संवाद साधत आहे. या कार्यक्रमांमध्ये अजित पवारांचे गुलाबी कपडे लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. अजित पवार हे बारामतीचे आमदार आहेत. त्यामुळे रितेश देशमुखने धनंजयचं गुलाबी जॅकेट पाहून ‘तुमचा टेलर बारामतीचा दिसतोय’, ‘ही बारामतीची स्टाईल आहे’, अशी प्रतिक्रिया दिली.
गुलाबी रंगावर अजित पवार काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेच्या एका कार्यक्रमात एका महिलेने अजित पवार यांना प्रश्न विचारला होता की “मागील दोन महिन्यांपासून तुम्ही सतत आम्हाला गुलाबी जॅकेटमध्ये दिसताय, तुम्ही सतत गुलाबी कपडे का घालता? बॅनरपासून सगळीकडेच गुलाबी रंग दिसतोय. तुम्हाला गुलाबी रंग खूप आवडतो का?” यावर अजित पवार म्हणाले, “तुम्ही सर्व महिला सतत वेगवेगळ्या साड्या नेसत असता. परंतु, त्या साड्यांमध्ये एखादी अशी साडी असते जी साडी पाहून तुमच्या जवळच्या सगळ्या मैत्रिणी, सहकारी आणि घरातली मंडळी तुम्हाला सांगतात की ही साडी तुमच्यावर खूप जास्त खुलून दिसते. तेव्हा ती साडी तुम्ही सतत नेसत असता. त्याचप्रमाणे माझ्या सहकाऱ्यांनी देखील मला सांगितलं की दादा, हे जॅकेट तुम्हाला लय चांगलं दिसतं. त्यामुळे मी ते जॅकेट सतत घालू लागलो. गुलाबी जॅकेट घालण्यामागे दुसरं काहीच कारण नाही. आपल्याला जे आवडतं ते आपण करायचं, फक्त ते दुसऱ्याला त्रासदायक ठरणार नाही याची काळजी घ्यावी, एवढाच या सगळ्यातून अर्थ घ्यायला हवा.”