Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सातवा आठवडा देखील दणक्यात पूर्ण झाला आहे. पण आठवड्याच्या शेवटी घरात निंदनीय घटना घडली. ज्याबद्दल सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान आर्या व निक्कीमध्ये धक्काबुकी झाली. याच वेळी आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. यामुळे आर्याला तात्पुर्ती जेलची शिक्षा देण्यात असली तरी आज ‘भाऊच्या धक्क्या’वर आर्याला कठोर शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचं याकडे अधिक लक्ष लागलं आहे. अशातच रितेश देशमुखने वाइल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुलेची चांगलीच कानउघडणी केल्याचं समोर आलं आहे.
गेल्या आठवड्याच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर संग्राम चौगुलेची जबरदस्त वाइल्ड कार्ड एन्ट्री पाहायला मिळाली. त्यामुळे संग्राम ‘बिग बॉस’च्या घरात फुल्ल राडा करणार अशा अपेक्षा प्रेक्षकांना होत्या. पण संग्राम सातव्या आठवड्यात तितकासा चांगला खेळताना दिसला नाही. त्यामुळे अनेकांनी नाराजी देखील व्यक्ती केली. याच पार्श्वभूमीवरून आता ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुख संग्रामला चांगलंच झापताना दिसत आहे.
नुकताच ‘कलर्स मराठी’ने ‘भाऊच्या धक्क्या’चा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रितेश संग्रामला सुनावतं म्हणतो की, संग्राम तुम्ही मिस्टर युनिव्हर्स आहात. यावर संग्राम म्हणतो,”हो भाऊ” त्यानंतर रितेश देशमुख म्हणतो, “पण ‘बिग बॉस’च्या घरात ‘मिस्टर इंडिया’ आहात. तुम्ही दिसतच नाही आहात.”
पुढे रितेश म्हणतो की, महाराष्ट्राची अपेक्षा होती की या घरात एक वाइल्ड कार्ड यावा, त्यांनी एक अख्खा गेम पलटवून टाकावा. पण या घरात तुम्ही वाइल्ड कार्ड म्हणून आला नाहीत तर माइल्ड कार्ड म्हणून आलेला आहात.
नेटकरी काय म्हणाले?
दरम्यान, या प्रोमोवर नेटकऱ्यांनी रितेश देशमुखच्या मताशी सहमती दर्शवून भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “खरंच आहे. संग्राम दादाने आमची निराश केली. कुठे भिडलेच नाहीत.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे की, रितेश दादा बरोबर बोलले. संग्राम दादा या आठवड्यात काहीच खेळला नाही. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “बरं झालं याला बोललं बाबा. माझ्या संग्रामकडून खूप अपेक्षा होत्या. तो अरबाजची वाट लावेल म्हणून पण त्याने अरबाजला काहीच केलं नाही.”