Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण तरीही चर्चा मात्र कायम आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील टॉप-६ सदस्य खूप चर्चेत आहेत. एवढंच नव्हे तर आता हे सदस्य आगामी चित्रपटाच्या ग्रँड प्रिमियरला देखील पाहायला मिळत आहेत. नुकताच अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता गश्मीर महाजनी यांच्या ‘फुलवंती’ चित्रपटाचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला. या ग्रँड प्रिमियर सोहळ्याला निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर आणि अभिजीत सावंत पाहायला मिळाला. अशातच उपविजेता अभिजीतला रितेश देशमुखने खास ट्रॉफी दिल्याचं समोर आलं आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण झाला. तर उपविजेता अभिजीत सावंत झाला. यावेळी सूरजला ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीसह १४ लाखांचा धनादेश देण्यात आला. पण, अभिजीतने ट्रॉफी जिंकली नसली तरी प्रेक्षकांसह रितेश देशमुखचं मन जिंकलं. त्यामुळेच त्याला रितेशने एक खास ट्रॉफी दिली. अभिजीतने नुकताच या ट्रॉफीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
हेही वाचा – Bigg Boss 18 : …म्हणून गुणरत्न सदावर्तेंनी ‘बिग बॉस’च्या घरात घातला गोंधळ, म्हणाले, “मी अन्न आणि पाणी…”
अभिजीतने रितेशने दिलेल्या ट्रॉफीचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “खूप खूप धन्यवाद रितेश भाऊ…तुम्हाला माझा गेम आवडला. मी तुमचं मन जिंकलं याचा मला खूप आनंद आहे आणि ही लय भारी ट्रॉफी तुम्ही मला दिली त्यासाठी मनापासून आभार.”
व्हिडीओच्या सुरुवातीला ट्रॉफीची झलक पाहायला मिळत आहे. या ट्रॉफीवर ‘लय भारी’ असं लिहिलं आहे. त्यानंतर अभिजीत म्हणतो, “भले माझ्या हातात ट्रॉफी आली नसेल. पण ही एक ओळख, आठवण म्हणून रितेश भाऊंनी ट्रॉफी मला दिली. देताना ते म्हणाले की, एक असा व्यक्ती, ज्याने योग्यपद्धतीने आपला ‘बिग बॉस’चा प्रवास पूर्ण केला. सुसंस्कृत पद्धतीने ‘बिग बॉस’चा खेळ खेळला आणि खूप प्रामाणिक होता. ज्याने फक्त लोकांचं नाही तर माझं मन जिंकलं. त्यामुळे त्यांनी मला ‘लय भारी’ पुरस्कार दिला आहे.”
पुढे अभिजीत म्हणाला, “ही ट्रॉफी साधी असेल. पण जे शब्द त्यांनी माझ्यासाठी संबोधले. त्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. एक माणूस म्हणून मी या घरात आपलं अस्तित्व एक चांगल्या पद्धतीने टिकवू शकलो. याचा मला अभिमान आहे. लोक कितीही काहीही म्हणू दे…मला माहितीये खरी गोष्ट काय आहे.” त्यानंतर अभिजीतने रितेश आणि जिनीलियाच्या ‘वेड’ चित्रपटाच्या शीर्षक गीतामधील काही ओळी गायल्या आहेत.
दरम्यान, अभिजीत सावंतच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिजीतचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे.