Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : आपल्या साध्या स्वभावाने आणि जबरदस्त खेळाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. स्वतःचं मत ठामपणे मांडता येत नाही, सगळं सांगावं लागतं यामुळे अनेकदा सूरजला नॉमिनेट केलं गेलं. पण प्रेक्षकांच्या प्रेमामुळे सूरज ७० दिवसांच्या प्रवासात बऱ्याचदा एलिमिनेट होण्यापासून वाचला आणि अखेर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता झाला.

७० दिवसांच्या प्रवासात सूरजची नाळ जोडली ही पंढरीनाथ कांबळेबरोबर. पहिल्या दिवसापासून पंढरीनाथ सूरजला सर्व काही समजवताना दिसला. जिथे सूरज बरोबर खेळला तिथे पंढरीनाथने त्याची पाठ थोपाटली. पण जिथे चुकला तिथे त्याचे कान पिळले. ‘बिग बॉस’च्या घरात हे एक सुंदर नातं पाहायला मिळालं. जेव्हा पंढरीनाथ ‘बिग बॉस’च्या घराबाहेर गेला तेव्हा त्याने सूरजचं पालकत्व स्वीकारल्याचं जाहीर केलं. “तो माझ्या सगळ्या गोष्टींचा वारसदार असेल आणि मी त्याचं पालकत्व आयुष्यभरासाठी घेतलं आहे”, असं पंढरीनाथ म्हणाला. पण यादरम्यान घरातील काही सदस्यांनी दोघांच्या या नात्यावर टीका केली. पंढरीनाथ सूरजला सतत टोकतो, त्याला बोलू देत नाही, असं म्हटलं गेलं. पण अखेर ट्रॉफी जिंकल्यावर सूरजने मान्य केलं की असं काही न करता. पंढरीनाथने त्याला खूप समजून घेतलं.

हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी’चा विजेता झाल्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना सूरज चव्हाणचं मोजक्या शब्दात उत्तर, म्हणाला…

सूरज जिंकल्यानंतर ‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सूरज पंढरीनाथ कांबळेविषयी भावना व्यक्त करताना दिसला. तो म्हणाला, “पॅडीदादांनी मला इतका जीव लावला ना. मी त्यांना माझे वडील, आप्पाच मानतो. त्यांनी मला समजून घेतलं. लय भारी मला जीव लावला आणि मला अभिमान आहे त्यांनी मला सपोर्ट केला.” सूरजच्या या विधानातून पंढरीनाथबरोबर असलेल्या नात्यावर टीका करणाऱ्यांना चांगलंच उत्तर मिळालं आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18 : हत्येआधी ज्योतिषाने सिद्धू मुसेवालाला केलं होतं सावध; तजिंदर बग्गा यांचा खुलासा, गुणरत्न सदावर्तेंना म्हणाले…

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम फेरीपर्यंत १७ सदस्यांपैकी सहा सदस्य पोहोचले. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे टॉप-६ सदस्य होते. यामध्ये सर्वात आधी जान्हवी किल्लेकरने ९ लाखांची सुटकेस घेऊन खेळ सोडला. त्यानंतर अंकिता, धनंजय आणि निक्की असे अनुक्रमे हे सदस्य नॉमिनेट झाले. अखेरीस सूरजने बाजी मारून ‘बिग बॉस’ची ट्रॉफी हाती घेतली.