Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच राडे होताना दिसत आहेत. आठवड्याभरातच घरात दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांमधील स्पर्धकांमध्ये सतत वाद होत आहेत. निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यातील वादाची चर्चा जोरदार सुरू आहे. वर्षा उसगांवकरांचा अपमान केल्यामुळे निक्कीवर टीका होत आहे. शनिवारी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने निक्कीचा चांगलाच समाचार घेतला. तिला झालेल्या सगळ्या प्रकारावरून माफी मागायला लावली. निक्की तांबोळी व्यतिरिक्त पंढरीनाथ कांबळे, वैभव चव्हाण, अंकिता प्रभू वालावलकर या सगळ्यांना देखील रितेशने चांगलंच सुनावलं आहे. आजच्या भाऊच्या धक्क्यावर फ्रेंडशिप डे साजरा होणार आहे. यावेळी रितेशने स्पर्धकांना एकमेकांच्या गळ्यात लॉकेट घालण्याचा टास्क दिला आहे. ज्याचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
फ्रेंडशिप डेनिमित्ताने गळ्यात घालणाऱ्या लॉकेटवर काही खोचक शब्द लिहिण्यात आले आहेत. त्यानुसार घरातील स्पर्धकांना लॉकेट घालायचं आहे. अंकिता प्रभू वालावलकरने ‘डबल ढोलकी’चं लॉकेट छोटे पुढारी घनःश्याम दरवडेच्या गळ्यात घातलं आहे. तसंच योगिता चव्हाणने देखील घनःश्यामला ‘डबल ढोलकी’चं लॉकेट घातलं आहे. याचे प्रोमो सध्या चर्चेत आले आहेत.
वर्षा उसगांवकरांनी निक्की नव्हे तर ‘या’ स्पर्धकाला घातलं लॉकेट
इतर स्पर्धकांप्रमाणे वर्षा उसगांवकर यांनी ‘मूर्ख मित्रा’चं लॉकेट जान्हवी किल्लेकरला घातलं आहे. यामागचं कारण सांगत वर्षा उसगांवकर म्हणाल्या, “मी तिला थोडंस चांगलं डोकं आहे, असं समजत होती. पण जवळजवळ तिसऱ्याच दिवशी तिने राजकारण केलं. काहीही कारण नसताना आपल्या निक्की नावाच्या जीवलग मैत्रिणीचा बालहट्ट पुरवण्यासाठी ज्याला काहीही अर्थ नव्हता. फक्त माझं खच्चीकरण करायचं होतं. म्हणजे निक्की म्हणते, मी महाराष्ट्राची मोठी अभिनेत्री आहे आणि ते मी दाखवते. मला अटिट्यूड आहे. पण अजून कुठूनही मी खरं दाखवलंच नाहीये इथे. नसलेल्या अटिट्यूड मी कसा दाखवणार. बरं हे तिच्यासाठी तिने हे केलं जे मला त्यावेळेला अत्यंत मूर्खपणाचं वागणं वाटलं. म्हणून मी हे लॉकेट तिला बहाल करते.” ( Bigg Boss Marathi )
हेही वाचा – Video: ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी फ्रेंडशिप डेच्या अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ
दरम्यान, वर्षा उसगांवकरांच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “याला म्हणतात शुद्ध भाषेत अपमान”, “बरोबर केलं ताई तुम्ही”, “ताईंचा वार म्हणजे एक बाण आणि एका दगडात दोन पक्षी…याला मनाची तीक्ष्ण उपस्थिती म्हणतात”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.