Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा दुसरा आठवडा देखील वाद आणि राड्याने सुरू झाला आहे. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी बीबी करन्सीवरून वाद झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर कॅप्टन्सीचा टास्क रंगला. घरात झालेल्या दोन गटातील स्पर्धकांनी कॅप्टन्सीचा टास्क सुरळीतरित्या पार पडला. अंकिता प्रभू वालावलकर ही ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील पहिली कॅप्टन झाली. पण कॅप्टन्सी टास्कदरम्यान असलेल्या संचालक वर्षा उसगांवकरांनी घेतलेला निर्णय निक्की तांबोळी व अरबाजच्या गटाला अयोग्य वाटला. मात्र नेटकरी वर्षा उसगांवकरांच्या याच निर्णयाचं कौतुक करत आहेत.
‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर कॅप्टन्सी टास्कदरम्यानचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत वर्षा उसगांवकरांनी अभिजीत सावंत व अंकिता प्रभू वालावलकर हे दोघं चालक म्हणून ट्रेनमध्ये आधी बसल्याचा निर्णय दिल्यानंतर झालेला वाद पाहायला मिळत आहे. त्यामुळे अरबाज व निक्कीच्या टीममधील स्पर्धक वर्षा उसगांवकरांवर ओरडताना दिसत आहेत. निर्णय अयोग्य असल्याचं अरबाज, जान्हवी, वैभव म्हणत आहेत. पण कॅप्टन्सीच्या पूर्ण टास्कमध्ये वर्षा उसगांवकरांनी घेतलेले निर्णय नेटकऱ्यांना योग्य वाटतं आहेत. त्यामुळे वर्षा उसगांवकरांचं नेटकरी कौतुक करत आहे.
हेही वाचा – अनंत अंबानी-राधिका मर्चंटने हनिमूनसाठी निवडलं पॅरिसमधील ‘हे’ रिसॉर्ट, किंमत वाचून व्हाल हैराण
नेटकरी काय म्हणाले? वाचा…
या व्हिडीओच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी वर्षा उसगांवकरांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “वर्षाताईंचा अंतिम निर्णय भारी होता”, “वर्षाताई एक नंबर”, “वर्षा उसगांवकरांना पूर्ण पाठिंबा”, “वर्षांताईचा निर्णय अगदी बरोबर होता”, असं नेटकरी म्हणत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “वर्षाताई १०० टक्के खूप सुंदर खेळ खेळला. असंच निर्णय घेत पुढे जात राहा.” तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “वर्षाताईंचा गेम एकदम योग्य होता…ते हरले ना म्हणून त्यांची जास्त चिडचिड झाली.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तुम्ही खरोखरच अगदी निष्पक्ष खेळलात… इतर निक्कीबाज टोळींच्या परिणामांना आणि कृतीला सामोरे जाण्यास तुमची चांगली तयारी ही दिसत होती, जी घाणेरडी आणि आक्रमक खेळत होती… तुम्ही खरोखर निःपक्षपाती आणि वाजवी होता. तुमचे निर्णय पक्षपात आणि भेदभाव न दाखवता पूर्णपणे वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित होते. इतर संघ खरोखरच ओरडत होता आणि तुमच्या संयमाची चाचणी घेत असताना तुम्ही खरोखर शांत आणि संयोजित होता. तुम्ही स्वतःला त्यांना चिखलात ओढू दिलं नाही.”
दरम्यान, पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेतला. वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, धनंजय पोवार, अंकिता प्रभू वालावकर, पुरुषोत्तमदादा पाटील आणि सूरज चव्हाण हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. पण यामधून पुरुषोत्तमदादा पाटील यांना कमी मतांमुळे घराबाहेर जावं लागलं.