Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा काही दिवसांपूर्वी महाअंतिम सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. सूरज चव्हाण विजेता ठरला, तर अभिजीत सावंत उपविजेता ठरला. त्यामुळे सध्या सूरजचं सर्वत्र कौतुक होतं आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम फेरीपर्यंत १७ सदस्यांपैकी सहा सदस्य पोहोचले. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे टॉप-६ सदस्य होते. यामध्ये सर्वात आधी जान्हवी किल्लेकरने ९ लाखांची सुटकेस घेऊन खेळ सोडला. त्यानंतर अंकिता, धनंजय आणि निक्की असे अनुक्रमे हे सदस्य नॉमिनेट झाले. अखेरीस सूरजने बाजी मारून ‘बिग बॉस’ची ट्रॉफी हाती घेतली. पण अनेकांना हे खटकलं आहे. सहानुभूतीमुळे बिग बॉस जिंकला, फक्त झापुक झुपूक करून जिंकाला, असं काहीजण म्हणताना दिसत आहे. नेटकऱ्यांच्या अशा अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “सूरजने शोसाठी काय केलं आहे? पूर्ण शो फक्त आणि फक्त निक्कीने चालवला होता. जर असल्यांना विजयी करायचं असेल तर सेलिब्रिटींना कशाला बोलावताय? असल्यांनाच आणून खेळावा बिग बॉस, बिग बॉस.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, नुसता गरीब आणि साधा होऊन जमत नाही रे. खेळ खेळता ही आला पाहिजे. सूरज जिंकला खरं, पण ते चुकीचं आहे हे सांगायचा प्रयत्न करत आहोत. तूच विचार कर शाळेत तुझी मुलगी/मुलगा मेहनत करेल आणि दुसरा विद्यार्थी जर गरीब आहे म्हणून मिरिटमध्ये येत असेल तर तुम्हाला चालेल का? निक्की, अभिजीत हे लोक खेळ खेळायला आले होते आणि त्यांनी हवी तितकी मेहनत पण घेतली. सूरजला तुम्ही कधी निदान स्वतःची मते तरी मांडताना बघितला आहे का? त्याला विजेता करणं योग्य आहे का? अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी करत सूरजला ट्रोल केलं आहे. या ट्रोलिंगवर सूरजने जबरदस्त उत्तर दिलं आहे.
‘कलाकट्टा’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना सूरजला ट्रोलिंगविषयी विचारण्यात आलं. यावर सूरजने मोजक्या शब्दातच उत्तर दिलं. सूरज म्हणाला, “मला त्यांना काहीच सांगायचं नाही. मी प्रेक्षकांची मनं जिंकली. जय हिंदी जय महाराष्ट्र.”
दरम्यान, सूरज चव्हाणला ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीसह १४.६ लाखांचा धनादेश बक्षीस स्वरुपात मिळाला आहे. सूरज या पैशांचा वापर घर बांधण्यासाठी करणार आहे, असं त्याने माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.