Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची अखेर सांगता झाली आहे. ७० दिवसांचा हा प्रवास चांगलाच गाजला. पहिल्या दिवसापासूनच सदस्यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात हंगामा केला. या पर्वातील प्रत्येक स्पर्धकाने आपल्या खेळाने, स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळेच हे स्पर्धक सुपरहिट झाले. शिवाय ‘बिग बॉस मराठी’चं पाचव्या पर्वाने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केलं.
रविवारी ( ६ ऑक्टोबर ), ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण हे टॉप-६ स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत पोहोचले. पण बाजी मारली सूरज चव्हाणने. तर उपविजेता अभिजीत सावंत ठरला. त्यामुळे सध्या सर्वत्र सूरजसह इतर टॉप-६मधील स्पर्धकांचं कौतुक होताना दिसत आहेत.
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व जिंकल्यानंतर सूरज आता माध्यमांसमोर आला आहे. पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तो सज्ज झाला आहे. सध्या त्याचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी हातात घेऊन पोज देताना दिसत आहे. प्रिटेंड पांढर शर्ट आणि जीन्स पँट अशा हटके लूकमध्ये पाहायला मिळत आहे. सूरजने केलेल्या या हटके लूकचं ‘बिग बॉस मराठी’शी खास कनेक्शन आहे.
सूरजच्या पांढऱ्या रंगाच्या शर्टवर उजव्या बाजूला ‘भाऊचा धक्का’ लिहिलं आहे. तर डाव्या बाजूला एक बंदूक दिसत आहे. तसंच पँटवर ‘झापूक झुपूक’, ‘बुक्कीत टेंगूळ’, ‘गुलीगत धोका’ असं लिहिलेलं पाहायला मिळत आहे. सूरजच्या या हटके लूकने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दरम्यान, सूरज चव्हाणला ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीसह १४.६ लाखांचा धनादेश बक्षीस स्वरुपात मिळाला आहे. सूरज या पैशांचा वापर घर बांधण्यासाठी करणार आहे, असं त्याने माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.