Yogita Chavan And Saorabh Choughule First Wedding Anniversary : ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘जीव माझा गुंतला’. या मालिकेने दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील अंतरा व मल्हाराच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. अभिनेत्री योगिता चव्हाणने ( Yogita Chavan ) अंतरा आणि अभिनेता सौरभ चौघुलने ( Saorabh Choughule ) मल्हारची भूमिका साकारली होती. ‘जीव माझा गुंतला’ मालिका संपल्यानंतर काही महिन्यांनी अंतरा व मल्हार म्हणजेच योगिता व सौरभ आयुष्यभराचे जोडीदार झाले. ३ मार्चला योगिता व सौरभचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. अचानक दोघांनी लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आज योगिता व सौरभच्या लग्नाला एक वर्षपूर्ण झालं आहे. यानिमित्ताने दोघं विदेशात फिरायला गेले आहेत.
सौरभ चौघुलने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने इन्स्टाग्रामवर नुकतीच खास पोस्ट शेअर केली आहे. सौरभने योगिताबरोबरचे काही फोटो शेअर करत लिहिलं आहे, “सगळ्यासाठी तुझे आभार आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.” सौरभच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सौरभने योगिताबरोबरचे शेअर केलेले फोटो हे इंडोनेशियातील बालीमधील आहेत. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने सौरभ व योगिता बालीला फिरायला गेले आहेत. फोटोमध्ये योगिता शेवाळी रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. तर सौरभ पांढरा शर्ट आणि कार्गोमध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्या फोटोमध्ये सौरभ योगिताच्या गालावर किस करताना दिसत असून दुसऱ्या फोटोमध्ये दोघांचा सेल्फी आहे.
सौरभच्या या पोस्टवर चाहत्यांनी दोघांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”, “तुमचा संसार सुखाचा होवो आणि नेहमी असेच आनंदी राहा”, “नांदा सौख्य भरे…अनेक शुभार्शिवाद”, अशा चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
दरम्यान, योगिता चव्हाण ‘बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्धीझोतात आली. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात योगिता चव्हाण पाहायला मिळाली. सौरभ चौघुलेबरोबर लग्न केल्यानंतर सात महिन्यांनी योगिता ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकली. पण या वादग्रस्त शोमध्ये तिचा जास्त काळ टिकाव लागला नाही. काही दिवसांत योगिता घराबाहेर झाली.