‘लावणी क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मेघा घाडगेने आपल्या जबरदस्त लावणीने आणि अदाकारी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मेघाच्या नृत्याचा जितका चाहता वर्ग आहे, तितकाच तिच्या अभिनयाचा देखील चाहता वर्ग आहे. ‘चल धर पकड’, ‘पोपट’, ‘पछाडलेला’ या चित्रपटांमधून मेघा घराघरात पोहोचली. त्यानंतर मेघा ‘बिग बॉस मराठी’च्या चौथा पर्वात झळकली. या पर्वातून मेघा २१ दिवसांनंतर बाहेर पडली. पण त्यानंतर मेघा अधिक प्रसिद्धीच्या झोतात आली. नुकतीच मेघाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे; तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्री मेघा घाडगे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी तिचे डान्स व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. तसंच आजूबाजूच्या घडामोंडीवर देखील परखडपणे बोलत असते. नुकतीच मेघाने तिच्या कार्यक्रमासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.
आज रात्री ८.३० वाजता तिचा ‘रंगबाजी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अस्सल लावण्यांचा मनमोहक नजराणा पाहायला मिळणार आहे. याच कार्यक्रमाची जाहिरात शेअर करत मेघा घाडगेने लिहिलं की, आज शुभारंभ …गेल्या दोन वर्षात अनेक अफवा, कटकारस्थान, फसवणूक, कलाकार असून दुसऱ्या कलाकारांला किती त्रास देता येईल, याचा कहर सहन करीत आत्ता कोणताही लावणीचा कार्यक्रम करायचा नाही. त्यापेक्षा सिनेमा, नाटक करू असं ठरवलं असताना माघार घ्यावी लागली. पण लावणीपासून माझी सुटका नाही. “दो दिल एक जान सारखं”. चला आत्ता काय नवीन ऐकायला मिळेल कुणाच ठाऊक. पण लावणीचा दर्जा आणि दर्जेदार लावण्या नुसत्या जाहिरातीवर लिहित नाही करून दाखवतो. तुमचे शुभ आशीर्वाद असूद्यात आमच्या पाठीशी. कार्यक्रमाला नक्की या…इथे फक्त लावणी पाहायला आणि ऐकायला मिळेल.
हेही वाचा – ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडने लग्नानंतरचा बायकोचा पहिला वाढदिवस ‘असा’ केला साजरा, फोटो शेअर करत म्हणाला…
दरम्यान, मेघा घाडगेचा ‘रंगबाजी’ कार्यक्रम लता मंगेशकर नाट्यगृह, मिरारोड येथे होणार आहे. मेघाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिचे ठिकठिकाणी लावणीचे कार्यक्रम असतात. गेल्या वर्षी तिच्या निर्मिती खाली तयार झालेलं ‘पोरी तुझ्या नावाचा गो’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप पाहायला मिळाला होता. याशिवाय ती ‘अप्सरा’ नावाच्या चित्रपटात झळकली होती.