Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकतीच दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेने एन्ट्री घेतली होती. दरवर्षी अंतिम आठवड्यात सर्व स्पर्धकांना त्यांचा घरातील प्रवास एका व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात येतो. मात्र, यंदा या स्पर्धकांना पहिल्यांदाच घराबाहेर प्रेक्षकांमध्ये नेऊन मोठ्या पडद्यावर त्यांच्या प्रवासाची चित्रफीत दाखवण्यात आली. या कार्यादरम्यान, सगळ्या स्पर्धकांबरोबर शिव ठाकरे उपस्थित होता. त्याने हा सीझन सुपरहिट झाल्याचं सर्व सदस्यांना सांगितलं. घरात सर्व सदस्यांची भेट घेतल्यावर शिवने ‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधला.
शिवला त्याच्या मते यावर्षीचा विजेता कोण असेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, “यंदाचा सीझन जिंकण्याची शक्यता कोणाची जास्त आहे हे मी तुम्हाला आता सांगतो, मला वैयक्तिक असं वाटतं की, प्रेक्षकांच्या मतांनुसार सूरज हा शो जिंकेल. पण, गेमचा विचार केला तर अभिजीत सावंतने हा शो जिंकला पाहिजे.”
शिव ठाकरे काय म्हणाला?
शिव पुढे म्हणाला, “मला हे दोघेही आवडतात. कारण, यांच्यातला एक जण ( अभिजीत ) खूप नीट, कोणतीही लाइन क्रॉस न करता खेळला आहे. याशिवाय सूरजबद्दल सांगायचं झालं तर, त्याला गेम काय असतो हे माहितीच नव्हतं, त्याला षडयंत्र वगैरे या गोष्टी माहिती नव्हत्या. त्यामुळे तो लोकांना जास्त आवडतो… असं पाहिलं तर सूरजला गरज जास्त आहे. कारण, यामुळे सूरजचं आयुष्य बदलून जाऊ शकतं. अभिजीत दादा तर आधीच लेजेंड आहेत. माझ्या मते यांच्यापैकी कोणीतरी जिकलं पाहिजे.”
“निक्की तर आधीच प्लेअर आहे कारण, आधी एक ‘बिग बॉस’ ती करून आलीये. घरातल्या बाकीच्यांना ज्या हव्या आहेत त्या गोष्टी मिळाल्या आहेत. एकंदर ट्रॉफी सूरजच्या हातात येईल कारण, गावागावांत त्याला खूप पाठिंबा आहे, आपुलकी आहे. पण, जर चांगल्या खेळाचा विचार केला तर अभिजीत सावंत…आता प्रेक्षकांनी विचार करून व्होटिंग करा…तुमचा निर्णय आहे.” असं शिव ठाकरेने ( Bigg Boss Marathi ) सांगितलं.