Bigg Boss Marathi 70 days : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. २८ जुलैला पार पडलेल्या ग्रँड प्रीमियरला घरात एकूण १६ सदस्यांनी प्रवेश केला होता. यानंतर सातव्या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. म्हणजेच, एकूण १७ सदस्य पाचव्या पर्वात सहभागी झाले होते. यांपैकी आता केवळ ८ जण घरात बाकी राहिले असून यांच्यासाठी ‘बिग बॉस’ने एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा नेमकी काय आहे जाणून घेऊयात…
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू होत्या. अशातच घरात पत्रकार परिषद सुद्धा पार पडली होती. त्यामुळे सीझन लवकर संपणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर ‘बिग बॉस’ने यासंदर्भात अधिकृतरित्या घोषणा केली आहे.
७० दिवसांमध्ये संपणार Bigg Boss Marathi
‘बिग बॉस मराठी’च्या नुकत्याच ( २३ सप्टेंबर ) प्रसारित झालेल्या भागात याबाबत घोषणा करण्यात आली आहे. बिग बॉस म्हणाले, “यंदाचा सीझन ब्लॉकबस्टर ठरला आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा या सीझनने बाजी मारली आहे. क्रिकेटमध्ये आधी टेस्ट मॅच व्हायच्या. कालांतराने एकदिवसीय सामने तर, आता सर्वत्र टी-२० ची क्रेझ निर्माण झाली आहे. अगदी याचप्रमाणे या सीझनबाबत ‘बिग बॉस’ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा सीझन १०० दिवसांचा नसेल. शंभर दिवसांऐवजी हा सीझन फक्त १० आठवड्यांचा म्हणजेच एकूण ७० दिवसांचा असेल.”
‘बिग बॉस’ची घोषणा ऐकून घरातील सगळ्याच सदस्यांना धक्का बसला होता. अनेकांना शेवटपर्यंत सीझन ७० दिवसांत संपणार यावर विश्वास बसत नव्हता. मात्र, ‘बिग बॉस’ने महाअंतिम सोहळ्याची तारीख जाहीर करत याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘ती’ घोषणा ऐकताच सदस्यांना बसला धक्का! प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “६ ऑक्टोबरला संपणार…”
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले म्हणजेच महाअंतिम सोहळा येत्या ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. ६ ऑक्टोबरला यंदाच्या पर्वात कोण विजयी ठरणार हे जाहीर केलं जाणार आहे. आजच्या दिवसापासून ग्रँड फिनालेला केवळ १४ दिवस बाकी आहेत असं देखील ‘बिग बॉस’ने सर्व सदस्यांना सांगितलं.