‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. गेल्याच आठवड्यात समृद्धी जाधव, तेजस्विनी लोणारी हे स्पर्धक घराबाहेर पडले. यांच्याबरोबरीने वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेले विशाल निकम आणि मीरा जगन्नाथ स्पर्धकदेखील बाहेर पडले, त्यांच्याबरोबरीने डॉ. रोहित शिंदेही बाहेर पडला.
या आठवड्यात चार नॉमिनेटेड झालेल्या सदस्यांपैकी म्हणजेच अपूर्वा नेमळेकर, विकास सावंत, स्नेहलता वसईकर, प्रसाद जवाडे यांच्यापैकी घराबाहेर स्नेहलात वसईकर हिला घराबाहेर पडावे लागले आहे. या नव्या भागात बऱ्याच लोकांनी प्रसादबद्दल नाराजी व्यक्त केली होती, पण जनता जनार्दनच्या कृपेने प्रसादचं घरात स्थान पुन्हा निश्चित झालं आहे.
आणखी वाचा : इराणी दिग्दर्शिकेने ‘केरळ चित्रपट महोत्सवात’ पाठवले स्वतःचे कापलेले केस; नेमकं कारण काय?
स्नेहलता घरातून बाहेर पडताना चांगलीच भावूक झाली. तिच्याबरोबरीनेच इतर स्पर्धकही त्यांचे अश्रू रोखू शकले नाहीत. जाताजाता अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर यांनी एकत्र स्नेहलताला मिठी मारली. बाहेर पडताना स्नेहलता म्हणाली, “मी कुणाला कळत नकळत दुखावलं असेन तर त्याबद्दल मी तुमची माफी मागेत पण मला खोटं वागता येत नाही.” खरंतर सगळ्यांसाठीच स्नेहलताचं बाहेर जाणं हे अनपेक्षित होतं.
बाहेर पडताच तिने बिग बॉसच्या मंचावर महेश मांजरेकर यांच्याशी गप्पा मारल्या आणि बिग बॉसच्या घरातील तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर महेश मांजरेकर यांनी बाहेरून इतर स्पर्धकांशी संपर्क साधला तेव्हा स्नेहलताने सगळ्यांना खूप शुभेच्छा दिल्या. खासकरून अक्षयसाठी तिने शुभेच्छा दिल्या, ती म्हणाली, “अक्षय मला असं मनापासून वाटतं की हा सीझन टू जिंकावास, टू खूप छान खेळतोयस आणि त्यामुळेच ही ट्रॉफी तुझ्या हातात मला पाहायची आहे.” स्नेहलताच्या या बोलण्याने अक्षय पुन्हा भावूक झाला. आता पुढच्या आठवड्यात कोण राहील? कोण जाईल? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन? कोण होईल नॉमिनेट? कोण होईल सेफ? यासाठी कार्यक्रम पुढच्या आठवडयात बघावा लागेल.