Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan : सूरज चव्हाणने महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांचं मन जिंकत ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. सूरज घरात नेहमी ‘आपला पॅटर्न वेगळाय, ही ट्रॉफी मी जिंकणार, मला माझ्या चाहत्यांवर पूर्ण विश्वास आहे’ असं म्हणायचा. अखेर त्याचे हे शब्द खरे ठरले आहेत. निक्की तांबोळी, अभिजीत सावंत अशा तगड्या स्पर्धकांना टॉप-३ मध्ये टक्कर देत सूरजने हे विजेतेपद पटकावलं आहे.

सूरजने असंख्य अडचणींवर मात करत यशाचा हा एवढा मोठा टप्पा गाठला आहे. त्याच्या आई-बाबांचं लहानपणीचं निधन झाल्याने सूरजला शिक्षण घेता आलं नाही. मोठ्या बहिणीने याचा सांभाळ केला. ‘बिग बॉस’च्या घरात पॅडी आणि अंकिता त्याला सगळे टास्क समजावून सांगायचे. पंढरीनाथ आणि सूरजच्या सुंदर मैत्रीची तर सीझनभर प्रचंड चर्चा झाली.

विशेषत: ‘टीम बी’ने सूरजला पहिल्या दिवसापासून भक्कम साथ दिली आणि या सगळ्या सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे तसेच प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आज त्याला ‘बिग बॉस’च्या ट्रॉफी जिंकता आली. सूरजला ‘बिग बॉस’ची झगमगती ट्रॉफी आणि १४.६ लाखांचा धनादेश बक्षीस म्हणून मिळाला आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : लहानपणी आई-वडिलांचं निधन, सख्ख्या ५ बहिणी अन्…; Bigg Boss विजेत्या सूरज चव्हाणचा संघर्षमय प्रवास, जाणून घ्या…

Bigg Boss Marathi : सूरज चव्हाण काय म्हणाला?

विजयी झाल्यावर सूरज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला, “मी माझ्या सर्व चाहत्यांचे आणि ‘बिग बॉस’चे मनापासून आभार मानतो. मला प्रचंड अभिमान आहे की, मी ‘बिग बॉस’ची ही ट्रॉफी जिंकली. मी आधीच म्हणालो होतो, यंदा ट्रॉफी मीच जिंकणार आणि ही ट्रॉफी ‘झापुक झुपूक’ पॅटर्नमध्ये घरी घेऊन जाणार…ते आज खरं झालं आहे. आपला पॅटर्न एकदम हटके आहे. गुलीगत पॅटर्न…बुक्कीत टेंगूळ!”

Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan :
Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan : सूरज चव्हाणची पहिली प्रतिक्रिया

हेही वाचा : सूरज चव्हाण Bigg Boss Marathi 5 चा विजेता ठरल्यावर जिनिलीया देशमुख ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली

पुढे, “जिंकलेल्या धनराशीचं काय करणार?” या प्रश्नावर सूरज चव्हाण म्हणाला, “मला घर बांधायचंय त्यामुळे ही रक्कम मी घर बांधण्यासाठी वापरणार आहे. त्या घराला म्हणजेच घर बांधून झाल्यावर मी माझ्या घराला ‘बिग बॉस’चं नाव देणार आहे.”

दरम्यान, सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून सूरज चव्हाणवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. यंदाचा होस्ट असलेल्या रितेश देशमुखने तर त्याच्याबरोबर खास सेल्फी फोटो शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.