Bigg Boss Marathi Fame Ankita Walawalkar & Suraj Chavan : सध्या ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाण त्याच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सूरज या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सूरजने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधील सह-स्पर्धकांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे.

सूरज वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, योगिता चव्हाण यांच्या पाठोपाठ आता अंकिता वालावलकरच्या घरी देखील पोहोचला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिताने सूरजला राखी बांधली होती. तेव्हापासून या भावा-बहिणीची जोडी कायम चर्चेत असते. अंकिता व तिच्या नवऱ्याची भेट घेऊन सूरजने कुणालला खास विनंती केली आहे. याचा व्हिडीओ ‘कोकण हार्टेड गर्ल’ने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तो नेमकं काय म्हणतोय पाहुयात…

‘झापुक झुपूक’ सिनेमातील गाण्यासाठी कुणाल भगत व त्याचा साथीदार करण यांनी संगीत दिलं आहे. अंकिताचा नवरा कुणाल भगत हा लोकप्रिय मराठी संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. यामुळेच बहिणीच्या घरी गेल्यावर सूरजने दाजींना खास विनंती केली आहे. सध्या सूरज त्याच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटातील गाण्यावर सर्वत्र डान्स करताना दिसतो. अनेक सेलिब्रिटींबरोबर तो थिरकला आहे…आता ‘गुलीगत किंग’ने अंकिताच्या नवऱ्याला म्हणजेच त्याच्या दाजींना डान्स करण्याची विनंती केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

कुणाल हसून सूरजला नकार देत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच “तुझी अंकिता ताई डान्स करेल” असंही कुणालने या व्हिडीओमध्ये सूरजला सांगितलं. तर, “दाजी डान्स करा मी तुम्हाला शिकवतो” असं सूरज यामध्ये बोलताना दिसतोय. आता या दोघांचा जबरदस्त डान्स पाहायला मिळणार की नाही याची अंकिता व सूरजचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

तसेच दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये अंकिता सूरजला हापूस आंबे खायला देऊन भावाशी गप्पा मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. सूरजने याआधी वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, योगिता चव्हाण यांच्या घरी चित्रपटातील ‘झापुक झुपूक’ गाण्यातील हूकस्टेप्सनुसार डान्स केला आहे.

दरम्यान, सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला हा बहुप्रतीक्षित सिनेमा येत्या २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.