Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’च्या घरात या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क नुकताच पार पडला. पाचव्या आठवड्यात घरात मानकाप्याची एन्ट्री झाली आहे. यामुळे ‘बिग बॉस’ने घरातील सर्व सदस्यांना “एकटं फिरायचं नाही इथून पुढे आठवडाभर सर्वांना नेमून दिलेल्या जोडीदाराबरोबर राहावं लागेल” असे आदेश दिले आहेत. ‘बिग बॉस’कडून आर्या- अरबाज, अभिजीत-निक्की अशा एकूण ६ जोड्या बनवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या आठवड्यात जोड्यांनुसार सर्व सदस्यांना नॉमिनेट करावं लागलं.
मानकाप्याच्या गुहेत शिरून सर्वांना गुप्त पद्धतीने नॉमिनेशन कार्य पार पाडायचं होतं. आता घरात ‘ए’ टीममध्ये उभी फूट पडल्याने बहुतांश सदस्यांनी निक्कीला नॉमिनेट केलं आणि तिच्या जोडीला या आठवड्यात अभिजीत असल्याने त्याला सुद्धा याचा फटका बसला.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार! ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका, पाहा प्रोमो
सरतेशेवटी सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले चार सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर आणि निक्की तांबोळी हे सदस्य या आठवड्यात घराबाहेर होणाच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले. ‘बिग बॉस’ने घरात घोषणा करत या आठवड्यात नॉमिनेट असलेल्या सदस्यांची नावं देखील सांगितली. परंतु, यावेळी एक मोठा ट्विस्ट असेल तो ‘बिग बॉस’ने सदस्यांसमोर उघड केलेला नाही.
दर आठवड्यात नॉमिनेशन जाहीर झाल्यावर व्होटिंग लाइन्स ओपन होतात. पण, या आठवड्यात व्होटिंग लाइन्स अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे यावेळी कोणीही घराबाहेर जाणार नाही हे स्पष्ट होतं.
अरबाज-निक्कीमध्ये वाद
निक्की-अरबाजमध्ये वाद झाल्यावर त्याने घरात आदळआपट केल्याचं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’च्या घरात एवढा मोठा राडा झाल्यावर सर्व सदस्यांना ताबडतोब लिव्हिंग एरियामध्ये जमण्याचे आदेश देण्यात आले.
“घरात तोडफोड करणं अत्यंत चुकीचं आहे” असं ‘बिग बॉस’कडून अरबाजला सांगण्यात आलं. तसेच याची शिक्षा म्हणून या आठवड्यात अरबाजकडून कॅप्टन्सीची उमेदवारी काढून घेण्यात आली आहे. आता रितेश देशमुख अरबाजला काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.