यंदा बिग बॉसचे चौथे पर्व चांगलेच चर्चेत आहे. विविध कारणांमुळे चर्चेत असलेला बिग बॉस मराठी हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या आठवड्यात महेश मांजरेकरांनी चावडीवर घरातील टॉप ५ सदस्य कोण असा खेळ खेळला. यावेळी घरात असलेल्या सर्वच सदस्यांनी तेजस्विनी लोणारीचे नाव घेतले. हे पाहिल्यानंतर तेजस्विनी भारावली आणि तिने एक पोस्ट शेअर करत सर्वांचेच आभार मानले.
बिग बॉस मराठीचे पर्व सुरु झाल्यापासून त्यात दिवसेंदिवस येणारे ट्विस्ट, स्पर्धकांचे मतभेद, कामांवरुन होणारे वाद आणि त्यांचा खेळ यावरुन हा कार्यक्रम गाजताना दिसत आहे. यंदा बिग बॉस घरात सहभागी झालेली तेजस्विनी लोणारी हिला हाताला दुखापत झाल्याने घराबाहेर पडावं लागलं. त्यामुळे अनेक चाहते नाराज झाले होते. तिच्या एक्झिटमुळे सर्वांनाच धक्का बसला होता.
आणखी वाचा : अपूर्वा नेमळेकरचा पूर्वाश्रमीचा पती आहे शिवसेना पदाधिकारी, ‘या’ कारणामुळे झालेला दोघांचा घटस्फोट
पण काही दिवसांपूर्वीचा एक एपिसोड पाहून तेजस्विनी लोणारी ही भावूक झाली. यावेळी अनेक सदस्यांनी टॉप 5च्या यादीत तेजस्विनीचे नाव घेतले होते. याचा एक व्हिडीओ तेजस्विनीने शेअर केला आहे. याला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
“बिग बॉस ची ट्रॉफी जिंकता आली नसली तरी प्रेक्षकांची आणि प्रतिस्पर्ध्यांची मने जिंकता आली ह्याचा आनंद खूप मोठा आहे. दुर्दैवाने टॉप ५ मध्ये मी नसणार आहे पण माझ्या शुभेच्छा मात्र माझ्या टॉप ५ मधील प्रतिस्पर्धी मित्रांसोबत असतीलच..! तुमच्या ह्या प्रेमाबद्दल शब्दच नाहीत..! लव्ह यू ऑल..! बिग बॉसच्या सदस्यांना खूप शुभेच्छा”, असे तिने म्हटले आहे.
तेजस्विनीच्या या पोस्ट चाहत्यांनी खूप कमेंट केल्या आहेत. यात अभिनेत्री मेघा धाडेने कमेंट केली आहे. “घाबरु नकोस, येत्या फिनालेला तूच रनरअप जिंकणार आहे. कारण विजेती तर तूच आहेस”, असे तिने म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने तू टॉप ५ पैकी एक विजेती होतीस, अशी कमेंट केली आहे. तर एकाने तू पुढच्या बिग बॉसला ये तू तेजू, असे म्हटले आहे.