‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या ८ जानेवारीला बिग बॉस मराठीचा अंतिम सोहळा रंगणार आहे. बिग बॉसच्या यंदाच्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा होण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. नुकतंच बिग बॉसला टॉप पाच स्पर्धक मिळाले आहेत. तर एका सदस्याचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे.
बिग बॉस मराठी या पर्वाची सुरुवात २ ऑक्टोबरला झाली होती. यावेळी तब्बल १६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होते. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातून प्रसाद जवादे बाहेर पडला. त्यानंतर बिग बॉसने घरात मीड विक एव्हिकेशन पार पडणार असल्याचे सांगितले. बिग बॉसने जाहीर केलेला हा ट्वीस्ट पाहून सर्व सदस्यांना धक्का बसला होता.
आणखी वाचा : “अस्सल दादरकर, आठ वर्षांचे रिलेशनशिप, लग्न अन्…” ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आलेल्या अपूर्वा नेमळेकरबद्दल माहितीये का?
त्यातच अपूर्वा नेमळेकरला ‘तिकीट टू फिनाले’ मिळाल्याने ती टॉप पाच स्पर्धकांमध्ये पोहोचली होती. यामुळे अमृता धोंगडे, अक्षय केळकर,आरोह वेलणकर, किरण माने, राखी सावंत हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत होते. यावेळी अमृता धोंगडेला ती घराबाहेर जाईल, असे वाटत असल्याने ती रडत होती. पण अखेर काल झालेल्या बिग बॉसच्या भागात अभिनेता आरोह वेलणकरला घराबाहेर जावे लागले. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला.
आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्याच्या जय्यत तयारीला सुरुवात, तारीख आली समोर
त्यामुळे आता बिग बॉसच्या घराला टॉप ५ सदस्य मिळाले आहेत. यात अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, किरण माने, राखी सावंत या सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्याची जय्यत तयाराही सुरु आहे. त्यामुळे आता बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कोण जिंकणार हे पाहणे? महत्त्वाचे ठरणार आहे.