Suraj Chavan Wedding Plan: बारामतीजवळच्या मोढवे गावातील सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी जिंकली आहे. सूरजने सर्व स्पर्धकांना मागे टाकत हा शो जिंकला. सध्या सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा आहे. सूरजवर प्रेक्षक आणि चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. सूरजने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यावर आनंद व्यक्त केला आहे. या ट्रॉफीची रोज पूजा करणार, असं तो म्हणाला आहे.

कुटुंबाला भेटण्याआधी देवाचे दर्शन घेणार असल्याचं सूरज म्हणाला. बक्षिसाची रक्कम मिळाली, त्यातून घर बांधणार आणि उरलेले पैसे बँकेत ठेवणार, असं सूरज म्हणाला. “बिग बॉससाठी विचारणा झाली तेव्हा मी फोन उचलत नव्हतो. मी क्रिकेट खेळत असायचो, पण फोन नाही उचलायचो. कारण मला असे कितीतरी फोन यायचे, त्यामुळे मला वाटायचं की हे मला फसवतील. नंतर मला कळालं की ते मला बिग बॉसमध्ये बोलवत आहेत. माझी इच्छा नव्हतीच, माझं घर आणि गाव सोडून मला यायचं नव्हतं. आबांनी सांगितलं की तू गेलं पाहिजे, गावाचं नाव मोठं केलं पाहिजे, त्यामुळे मी आलो,” असं सूरजने राजश्री मराठीशी बोलताना म्हटलं.

हेही वाचा – सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi जिंकल्यावर अंकिता वालावलकरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मिळालेलं…”

लग्नाबद्दल विचारल्यावर सूरज चव्हाण म्हणाला…

“बघू आता.. लगेच नको कारण संसाराला लागलो की कामात लक्ष देता येत नाही. लगेच नाही, पण करायचंय,” असं सूरज लाजत म्हणाला. नंतर त्याने त्याच्या अपेक्षा सांगितल्या. “शिकलेली मुलगी असावी, माझ्यावर विश्वास असला पाहिजे, शांत स्वभाव, मला समजून घेणारी हवी, साधी हवी. साडी नेसणारी मुलगी हवी, कारण मला दुसरे ड्रेस घालणाऱ्या अशा मुली आवडत नाहीत. मला डोक्यावर पदर घेणाऱ्या मुली आवडतात. गावाकडची साधी मुलगी हवी,” असं सूरजने सांगितलं.

हेही वाचा – सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi 5 जिंकल्यावर प्रवीण तरडेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

सूरज चव्हाणला पाच बहिणी आहे. त्याला आई-वडील नाहीत. त्याचे वडील कॅन्सरने वारले, त्यानंतर आईचेही निधन झाले. सूरजचा सांभाळ त्याच्या बहिणींनी केला. मोलमजुरी करून जगणारा सूरज टिकटॉकमुळे प्रसिद्ध झाला. नंतर तो इन्स्टाग्रामवर रील बनवू लागला. यातून होणाऱ्या कमाईतून तो उदरनिर्वाह करत होता, अशातच त्याला बिग बॉस मराठीची ऑफर मिळाली. ७० दिवसांच्या प्रवासानंतर सर्व स्पर्धकांना मागे टाकत तो या शोचा विजेता ठरला.