Bigg Boss Marathi Winners : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या जबरदस्त सुरू आहे. पहिल्या आठवड्यापासून वाद, राडे होताना दिसत आहेत. पण दुसऱ्या बाजूला स्पर्धक टास्क देखील चांगला खेळताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पर्वानिमित्ताने आधीच पर्वाचे विजेते सध्या काय करतात? जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेघा धाडे

अभिनेत्री मेघा धाडे हिने ‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व ( Bigg Boss Marathi ) चांगलंच गाजवलं होतं. या पहिल्या पर्वात अनेक तगडे स्पर्धक मेघाला टक्कर देण्यासाठी होते. पण मेघाने कल्पक युक्तीने खेळ खेळून ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या पर्वातील मेघाची मैत्री अनेकांबरोबर झाली. पण सई लोकूर व पुष्कर जोगबरोबरची मैत्रीण तिची चांगलीच चर्चेत आली होती. या त्रिकुटावर प्रेक्षकांना भरभरून प्रेम केलं. त्यामुळे महाअंतिम फेरीपर्यंत हे त्रिकुट टिकून राहिलं होतं. मेघाने ‘बिग बॉस’चं पहिलं पर्व जिंकल्यानंतर ती ‘हिंदी बिग बॉस’च्या १२व्या पर्वात झळकली. वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून तिची ‘बिग बॉस’च्या १२व्या पर्वात एन्ट्री झाली होती. या पर्वातील टॉप-१० स्पर्धकांपैकी मेघा आहे.

हिंदी ‘बिग बॉस’नंतर मेघा मराठी सिनेसृष्टीपासून दूर राहून वैयक्तिक आयुष्यात व्यग्र होती. मग तिने राजकारणात प्रवेश केला. २०२३ला मेघाने भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तिने भाजपात प्रवेश केला. त्यानंतर लगेच ऑगस्टमध्ये मेघाची महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. सध्या ती महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ उपाध्यक्ष आहे.

हेही वाचा – Video: “सॉरी कियारा…”, सिद्धार्थ मल्होत्राबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॉडलने मागितली माफी

राजकारणाबरोबर व्यवसाय क्षेत्रात मेघाने पाऊल ठेवलं आहे. यंदाच फेब्रुवारी महिन्यात मेघाने रत्नागिरीतील गणेशगुळे येथील समुद्र किनारी सुंदर व्हिला सुरू केला. ‘व्हिला मँगोस अँड सीशेल्स ‘(Villa Mangoes And Seashells) असं व्हिलाचं नाव आहे. सिनेसृष्टीपासून दूर राहून मेघा आता राजकारणात व व्यवसायात अधिक सक्रिय झाली आहे.

शिव ठाकरे

‘एम-टीव्ही’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘रोडिज’च्या १५ पर्वातील उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेल्या शिव ठाकरेनं ‘बिग बॉस मराठी’चं दुसरं पर्व ( Bigg Boss Marathi ) जबरदस्त खेळलं. यापर्वात टास्क खेळताना शिव ठाकरेला पाहण्याची एक वेगळी मजा होती. तो अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने टास्क खेळताना दिसला. त्याच्या साधेपणाने आणि गावरान लहेजाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या पर्वात त्याला जोडीदार देखील मिळाली होती. वीणा जगतापबरोबर त्याचं घनिष्ठ नातं निर्माण झालं. एवढंच नाहीतर त्याने एका टास्कमध्ये वीणासाठी हातावर टॅटू गोंदून घेतला होता. दोघांची जोडी सुपरहिट झाली होती. शिव आणि वीणा ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात टॉप-३पर्यंत पोहोचले. पण शिवने बाजी मारली. ‘बिग बॉस मराठी’चं दुसरं पर्व जिंकल्यानंतर काही काळ शिव-वीणा एकत्र दिसले. त्यानंतर दोघांचं नातं संपुष्टात आलं.

Bigg Boss Marathi

‘बिग बॉस मराठी’नंतर शिव ठाकरे देखील मेघा धाडेप्रमाणे हिंदी बिग बॉसमध्ये पाहायला मिळाला. ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वात शिव ठाकरे झळकला. या पर्वातही तो जबरदस्त खेळला आणि म्हणूनच महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचला. ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वाची ट्रॉफी एमसी स्टॅनने जिंकली असली तरी शिव ठाकरेने प्रेक्षकांनी मनं जिंकली. यामुळे तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला.

हेही वाचा – Video: “वर्णद्वेष बंद करा”, ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून भडकले प्रेक्षक, म्हणाले, “सावळ्या अभिनेत्री चालत नाहीत का?”

यानंतर शिव ‘खतरों के खिलाडी’च्या १३व्या पर्वात सहभागी झाला. या कार्यक्रमातही तो अंतिम फेरीपर्यंत पोहोचला, पण जिंकण्याची संधी हुकली. या चार लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोनंतर शिव काही थांबला नाही. ‘झलक दिखला जा’च्या ११व्या पर्वात तो पाहायला मिळाला. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वानंतर हिंदी कार्यक्रमात झळकल्यामुळे शिवची लोकप्रिय मोठ्या प्रमाणात वाढली. आता तो अल्बम साँगमध्ये दिसत आहे.

विशाल निकम

‘बिग बॉस मराठी’च्या दोन पर्वांना जसा प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम झाला होता. ‘साता जल्माच्या गाठी’, ‘दख्खनचा राजा जोतिबा’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला विशाल निकम ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वामुळे अधिक प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘बिग बॉस’मध्ये खेळ विशालने आपल्या युक्तीसह शक्तीने खूप चांगल्या पद्धतीने खेळला. अनेकदा महेश मांजरेकरांनी त्याचे कान पिळलेले. त्यामुळे आपल्या खेळता तशी सुधारणा करून विशालने ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची ट्रॉफी जिंकली.

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात ( Bigg Boss Marathi ) बाजी मारल्यानंतर विशाल ‘आई मायेचं कवच’ मालिकेत झळकला. त्यानंतर त्याने काही जाहिराती व अल्बम साँगमध्ये काम केलं. सध्या विशाल ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’मध्ये पाहायला मिळत आहे. या मालिकेत विशालने साकारलेली रायाची भूमिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. याशिवाय विशाल महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो ‘चंद्राजी कोठार’ यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

अक्षय केळकर

मराठी, हिंदी मालिकाविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अक्षय केळकर. ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व अक्षय ‘क.मा.ल’ खेळला. सुरुवातीला तो दिसत नव्हता पण नंतर त्याने चांगली खेळी खेळली. जेव्हा अक्षय ‘बिग बॉस मराठी’ जिंकला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण प्रेक्षकांच्या मतांनीच अक्षयला विजयी घोषित केलं.

हेही वाचा – Video: खुशबू तावडे व संग्राम साळवीच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार, ‘या’ महिन्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात ( Bigg Boss Marathi ) यश मिळाल्यानंतर ‘कलर्स मराठी’ने अक्षयला आणखी एक संधी दिली. ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमातील सूत्रसंचालनाची जबाबदारी अक्षयला दिली. अक्षयने उत्कृष्ट रित्या ही सूत्रसंचालनाची भूमिका पार पडला. यावेळी त्याच्या विनोदीशैलीने प्रेक्षकांची अधिक मनं जिंकली. सध्या अक्षय ‘कलर्स मराठी’च्या ‘अबीर गुलाल’ मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत त्याने अगस्त्यची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi winner megha dhade shiv thakare vishal nikam akshay kelkar what they are upto now pps