‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचा लवकरच ‘झापुक झुपूक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात सूरज प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं. याचा व्हिडीओ केदार शिंदेंनी सोशल मीडियावर शेअर केला होता. ‘झापुक झुपूक’ या चित्रपटामुळेच सध्या सूरज चर्चेत आहे. नुकतीच सूरजची भरत जाधव यांच्याबरोबर ग्रेट भेट झाली. या ग्रेट भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सूरज चव्हाणने इन्स्टाग्रामवर भरत जाधव यांच्याबरोबरच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला सूरज भरत जाधव यांच्या पाया पडताना दिसत आहे. त्यानंतर तो भरत यांना मिठी मारतो आणि मग दोघांच्या गप्पा रंगतात, असं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सूरज आणि भरत जाधव यांच्या भेटीचा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.
सूरजने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “भरत जाधव सर मला लय आवडतात….त्यांचे चित्रपट बघून खूप हसायला येतं. काल त्यांची भेट झाली. सर खूप खूप भारी आहेत. त्यांनी मला आपल्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि खूप प्रेमाने वेळ दिला…भरत सर खूप खूप आभार…भावांनो आज मी खूप खुश हाय, सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या ‘झापुक झुपूक’ गोलीगत शुभेच्छा…”
सूरज चव्हाण व भरत जाधव यांच्या भेटीचा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “भावा, तुझी प्रगती बघून छान वाटतंय…खूप मोठा हो”, “भावा खरंच खूप मोठा माणूस हो”, “सूरज भावा लय भारी मस्त तुझी अशीच खूप प्रगती होत राहो ही सदिच्छा”, “आमची सामान्य मुलाची स्वप्न साक्षात तु खरी करतोय भावा”, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
दरम्यान, ‘झापुकू झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाणसह ‘पिरतीचा उनवा उरी पेटला’ मालिकेतील इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, ‘अबीर गुलाल’ मालिकेतील पायल जाधव, ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे झळकणार आहेत. त्यामुळे आता सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.