Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. यंदा घरात एकूण १६ स्पर्धकांनी प्रवेश केला होता. यापैकी पुरुषोत्तम दादा पाटील यांनी पहिल्याच आठवड्यात घराचा निरोप घेतला. यानंतर दुसऱ्या आठवड्यात एकही स्पर्धक घराबाहेर गेला नाही. ‘कलर्स मराठी’ वाहिनी नव्या रुपात दाखल झाल्याने दुसऱ्या आठवड्यात एकाही स्पर्धकाला घरचा रस्ता दाखवण्यात आला नाही. परंतु, तिसऱ्या आठवड्यात सर्वांनाच धक्का मिळाला आहे. कारण, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून एक नव्हे तर दोन स्पर्धक बेघर झाले आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरातून सर्वप्रथम निखिल दामले एविक्ट झाला. यानंतर योगिता, सूरज आणि अभिजीतवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. अखेर योगिताचं नाव जाहीर करत रितेश देशमुखने या आठवड्यात डबल एविक्शन होणार असल्याचं सदस्यांना सांगितलं. घरातून एकाच दिवशी दोन सदस्य बाहेर गेल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
हेही वाचा : सवत माझी लाडाची! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम मुक्ता अन् सावनीची परदेशवारी; दोघींचे दुबईतील फोटो पाहिलेत का?
गेल्या दोन आठवड्यात आर्या ही योगिताची चांगली मैत्रीण झाली होती. त्यामुळे योगिता बेघर झाल्यावर आर्याला अश्रू अनावर झाले होते. रंगमंचावर योगिता अन् निखिलाचं रितेशने स्वागत केलं आणि या दोन्ही स्पर्धकांना त्यांचा तीन आठवड्यांचा घरातील प्रवास दाखवला. यानंतर रितेशने या दोघांना एक मोठी पॉवर दिली. ही पॉवर म्हणजे या दोघांच्या नावे असलेले म्युच्युअल फंडचे कॉइन हे दोन्ही स्पर्धक दुसऱ्याच्या नावे करून त्यांना वारसदार ( नॉमिनी ) करू शकतात.
‘या’ दोन सदस्यांना केलं वारसदार
रितेशने दिलेल्या माहितीनुसार योगिताने आर्याला वारसदार ( नॉमिनी ) केलं तर, निखिलने ही संधी धनंजय म्हणजेच डीपी दादांना दिली. यानंतर आर्या व धनंजय यांनी निखिल-योगिताचे आभार मानत त्यांना निरोप दिला. तर, जाता जाता योगिताने रितेश देशमुख आणि संपूर्ण ‘बिग बॉस मराठी’च्या टीमचे विशेष आभार मानले कारण, या सगळ्यांनी तीन आठवडे अभिनेत्रीला प्रचंड पाठिंबा दिला.
हेही वाचा : Bigg Boss Marathi च्या मोठा ट्विस्ट! घरात उघडणार नवीन खोली; नाव आहे खूपच खास, पाहा प्रोमो
तीन आठवड्यांमध्ये योगिताने अनेकदा घरी जाण्याची मागणी केली होती. त्यामुळे या काळात तिची अनेकदा समजूत काढण्यात आली होती. या सगळ्यात अभिनेत्रीला संपूर्ण टीमने सहकार्य केल्याने तिने सर्वांचे विशेष आभार मानले आहेत. आता घरातील उर्वरित सदस्यांपैकी पुढच्या आठवड्यात कोण नॉमिनेट होणार आणि चौथ्या आठवड्यात घरात काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.