‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा १०० दिवसांचा प्रवास अखेर काल संपुष्टात आला. या पर्वाचा महाअंतिम सोहळा मोठ्या जल्लोषात झाला. ‘बिग बॉस १७’चा विजेता लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी झाला. तर अभिषेक कुमार हा उपविजेता ठरला. मुनव्वर, अभिषेकसह मनारा चोप्रा, अंकिता लोखंडे आणि अरुण माशेट्टी हे विजेतेपदाच्या शर्यतीत होते. पण प्रेक्षकांच्या उदंड मतांनी मुनव्वर विजयी झाला.
मुनव्वरला ‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीसह ५० लाखांचा चेक मिळाला. तसेच एक Hyundai Creta गाडी दिली गेली. मुनव्वरने सुरुवातीपासून दिल, दिमाग आणि दम लावला होता. त्यामुळे तो या पर्वाचा विजेता होऊ शकला. याआधी त्याने कंगना रणौतचा रिअॅलिटी शो ‘लॉकअप’ जिंकला होता. मुनव्वरचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. त्याने आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. खडतर परिस्थितीतून आलेल्या या लोकप्रिय मुनव्वरला पहिला पगार किती मिळाला होता? जाणून घ्या…
हेही वाचा – Video: “हे खूप चुकीचं आहे…”, Bigg Boss 17च्या निकालावर अंकिता लोखंडेची जाऊबाई नाराज, म्हणाली…
मुनव्वरला ‘दाऊद, यमराज औरत’ या म्युजिक व्हिडीओमुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. करिअर सुरू होण्याआधी मुनव्वर एका भांड्यांच्या दुकानात काम करत होता. ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने पहिल्या पगाराचा खुलासा केला होता. मुनव्वर म्हणाला होता की, माझा पहिला पगार दिवसाला ६० रुपये होता. कारण इथे दिवसानुसार तुम्हाला पगार मिळतो. दिवस संपल्यानंतर रात्री तुमच्या हातात पगार असतो. आता कदाचित दिवसाला ३०० ते ३५० रुपये पगार मिळत असेल.
त्यानंतर मुनव्वरला विचारलं की, त्या पहिल्या पगाराचं काय केलंस? तेव्हा मुनव्वर म्हणाला, “ज्यांच्या घरी राहत होतो. त्यांना सगळे पैसे देऊ टाकले.”
दरम्यान, मुनव्वर फारुकीचा जन्म २८ जानेवारी १९९२ रोजी गुजरातमधील जुनागडमध्ये झाला होता. कौटुंबिक समस्या व वडिलांचं आजारपण यामुळे त्याला बालपणापासून काम करावं लागलं होतं. आईच्या निधनानंतर मुनव्वरने मुंबई गाठली. त्यानंतर २०२० मध्ये मुनव्वरच्या वडिलांचं निधन झालं.