‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा विजेता लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी मुनव्वरने दुसरं लग्न केल्याच्या बातम्या अचानक समोर आल्या. यामुळे मुनव्वरच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. मुनव्वरने दुसऱ्या लग्नाबद्दल वाच्यता केली नव्हती. अचानक त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या लग्नाची चर्चा रंगली. पण आता मुनव्वरने स्वतः दुसऱ्या लग्नावर शिक्कामोर्तब केला आहे. दुसऱ्या पत्नी व मुलांसह पिझ्झा पार्टी करतानाचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
गेल्या महिन्यात मुनव्वर फारुकीने मेकअप आर्टिस्ट महजबीन कोटवालाशी दुसऱ्यांदा लग्न केलं. मुनव्वरची दुसरी पत्नी महजबीन ही देखील घटस्फोटित असून तिला १० वर्षांची मुलगी आहे. मुनव्वर व महजबीनने अजूनपर्यंत लग्नाचे फोटो शेअर केले नाहीत. पण मुनव्वरने महजबीन आणि मुलांबरोबर असा काही फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे त्याने दुसरं लग्न केल्याचं निश्चित झालं आहे.
मुनव्वर फारुकीने चाहत्यांशी संवाद साधताना इन्स्टाग्रामवर आपल्या नव्या कुटुंबासह पिझ्झा पार्टी करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुनव्वरने महजबीनचा हातात हात घेतल्याचं पाहायला मिळत आहे. महजबीनच्या हातावर अजूनही मेहंदीचा रंग असून हिऱ्याच्या अंगठ्या तिच्या बोटात पाहायला मिळत आहेत. तसंच दोघांच्या समोर मुलं आहेत. एकाबाजूला मुनव्वरचा मुलगा दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला महजबीनची मुलगी आहे. आपल्या नव्या कुटुंबासह मुनव्वरची पिझ्झा पार्टी या फोटोमध्ये दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
माहितीनुसार, मुनव्वर व महजबीनने २६ मे २०२४ रोजी लग्न केलं आहे. या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. काही वृत्तात मुनव्वर व महजबीन या दोघांची भेट अभिनेत्री हिना खानमुळे झाल्याचं म्हटलं गेलं. हिनाने महजबीनला मुनव्वरचा मेकअप करण्यासाठी पाठवलं होतं. जेव्हा दोघं पहिल्यांदा भेटले त्यानंतर दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली.
दरम्यान, मुनव्वर फारुकीचा जन्म २८ जानेवारी १९९२ रोजी गुजरातमधील जुनागडमध्ये झाला होता. कौटुंबिक समस्या व वडिलांचं आजारपण यामुळे त्याला बालपणापासून काम करावं लागलं होतं. आईच्या निधनानंतर मुनव्वरने मुंबई गाठली. त्यानंतर २०२० मध्ये मुनव्वरच्या वडिलांचं निधन झालं.
मुनव्वरला ‘दाऊद, यमराज औरत’ या म्युजिक व्हिडीओमुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. करिअर सुरू होण्याआधी मुनव्वर एका भांड्यांच्या दुकानात काम करत होता. ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने पहिल्या पगाराचा खुलासा केला होता. मुनव्वर म्हणाला होता की, माझा पहिला पगार दिवसाला ६० रुपये होता. कारण इथे दिवसानुसार तुम्हाला पगार मिळतो. दिवस संपल्यानंतर रात्री तुमच्या हातात पगार असतो. आता कदाचित दिवसाला ३०० ते ३५० रुपये पगार मिळत असेल. त्यानंतर मुनव्वरला विचारलं की, त्या पहिल्या पगाराचं काय केलंस? तेव्हा मुनव्वर म्हणाला, “ज्यांच्या घरी राहत होतो. त्यांना सगळे पैसे देऊ टाकले.”