‘बिग बॉस १६’ या रिएलिटी शोमधून घराघरात पोहोचलेल्या एमसी स्टॅनची विजेता झाल्यानंतर क्रेझ वाढली आहे. रॅपर असलेल्या स्टॅनच्या लोकप्रियतेतही प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात स्टॅनच्या स्टाइलची चर्चा होती. गळ्यातील चैन, शूज व स्टॅनच्या हटके स्टाइलने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं.
एमसी स्टॅनने नुकतंच काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत हजेरी लावली. पार्टीसाठी स्टॅनने काळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. परंतु, या पार्टीत स्टॅनच्या चप्पलने लक्ष वेधून घेतलं. नेहमी स्टाइलिश शूजमध्ये दिसणारा स्टॅन इफ्तार पार्टीत खास कोल्हापुरी चप्पल घालून गेला होता.
स्टॅनचा हा व्हिडीओ ‘विरल भय्यानी’च्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पापाराझींनी ८० हजारांचे शूज म्हणताच स्टॅनने स्माइल दिल्याचं दिसत आहे. स्टॅनच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. “कोल्हापुरी पण ८०हजारांची आहे का?” अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “८० हजारांचे शूट कुठे गेले” असं म्हटलं आहे.
‘बिग बॉस १६’चा विजेता ठरलेला स्टॅन या शोमुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. बिग बॉसनंतर स्टॅनला अनेक ब्रँडच्या ऑफरही मिळाल्या आहेत.