BJP MP Girish Bapat Died: भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गिरीश बापट यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.
गिरीश बापट यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने गिरीश बापट यांना पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. रुचिताने गिरीश बापट यांच्याबरोबरचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. अभिनेत्रीने गिरीश बापट यांच्या निधनानंतर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा>> “गिरीश बापट यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद!” शरद पवार यांनी व्यक्त केल्या भावना
“भाऊ…तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले…आज माझ्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली की ती कधीच भरू शकणार नाही…वडिलांसारखी तुमची माया आणि शाब्बासकीची थाप मला कोण देणार…तुम्हांला विसरणे तर शक्यच नाही…भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ” , असं म्हणत रुचिताने गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गिरीश बापट गेल्या दीड वर्षांपासून आजाराशी झुंजत होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाही कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत गिरीश बापट एका मेळाव्यात सहभागी झाले होते. त्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली होती. इतके आजारी असूनही भाजपानं बापट यांना प्रचारात उतरवल्याचं टीकास्र विरोधकांनी सोडलं होतं.