अभिनेता शशांक केतकरने अलीकडेच मालाड येथील मालवणीमधील अस्वच्छतेबाबत मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार केली होती. एका व्हिडीओच्या माध्यमातून शशांकने ही तक्रार केली होती. ज्यावर मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेने तात्काळ कारवाई केली आहे. याचा व्हिडीओ शशांकने सोशल मीडियावर शेअर करत मुंबई महानगरपालिकेचे आभार मानले आहेत. त्यामुळेच सध्या नेटकरी शशांकचं कौतुक करत आहेत.
शशांक केतकर स्वच्छ झालेलं ठिकाण दाखवत म्हणाला की, वा क्या बात है. मला खरंच मुंबई महानगरपालिकेचं अभिनंदन करायचं आहे. आभार मानायचे आहेत. मी परवा व्हिडीओ टाकला होता. त्यानंतर कालची रात्री, आजची रात्र खरंच इथे सुधारणा दिसतेय. कचरा रस्त्यावरती नाहीये. या आपल्या गोमाता रोजच्या सवयीनुसार इथे येऊन थांबल्या आहेत. पण, खरंच लोकांनीही कचरा टाकला नसेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या भावांनी वेळच्यावेळी उचललाही असेल. त्यामुळे आता रस्त्यावर कचरा नाहीये. परिसर स्वच्छ दिसतोय. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे.”
पुढे शशांक म्हणाला, “या आपल्या गोमाता रोजच्या सवयीनुसार जणू काही वाट बघतायत कोणीतरी या आणि कचरा टाका. कदाचित बिचाऱ्यांना रात्रीचं जेवण मिळत नसेल. पण ही अवस्था अशी कायम राहावी, स्वच्छता कायम राहावी. इतकी माझी लोकांना आणि महापालिकेला विनंती आहे. तसंच या गोमातांचा जो कोणी मालक असेल त्याने त्यांच्या जेवण्याची वेगळी सोय करावी किंवा यांच्यासाठी आपण काहीतरी करू. “
हा व्हिडीओ शेअर करत शशांक केतकरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “A big thumbs up to @my_bmc ! मी तक्रारीचा व्हिडीओ टाकला आणि तुम्ही लगेच कारवाई केलीत…मला कल्पना आहे, सुधारणेला अजून खूप वाव आहे पण हेही नसे थोडके…सगळे मिळून करू की स्वच्छ भारताचा विचार…अशक्य नाहीये.”
हेही वाचा – Video: तेजश्री प्रधानला बनवता येत नाही ‘हा’ पदार्थ, इम्प्रेस करण्यासाठी करावी लागेल ‘ही’ गोष्ट
हेही वाचा – Bigg Boss 18: चाहत पांडेने सलमान खानला घातली लग्नाची मागणी, भाईजान म्हणाला, “तुझ्या आईचं आणि…”
सध्या शशांक केतकरचं कौतुक होतं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “शशांक तुझं खूप कौतुक. काही लोक म्हणतात एकट्याने बोलून काय होणार, त्यांनी पाहावं तो कचरा कसा साफ केलाय…खरंच शशांक तू काय ग्रेट आहेस. गोमातांचा जो कोणी मालक असेल त्यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, खूप छान…तुमच्या एका व्हिडीओमुळे इतका फरक पडतोय…मस्त. अशा अनेक प्रकारच्या कौतुकास्पद प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.