Celebrity MasterChef : ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम दिवसेंदिवस रंजक होतं चालला आहे. ११ स्पर्धकांबरोबर सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा प्रवास खूप मजेशीर होताना दिसत आहे. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून सर्वात आधी कॉमेडियन चंदन प्रभाकर बाहेर झाला. त्यानंतर लोकप्रिय गायक, ‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा उपविजेता अभिजीत सावंत एविक्ट झाला. आता आणखीन एक स्पर्धक ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून बाहेर झाला आहे. न शिजलेलं चिकन परीक्षकांना देणं या स्पर्धकाला महागात पडल्याचं समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये उषा नाडकर्णी यांनी कच्चं चिकन शिजवल्यामुळे परीक्षकांनी पदार्थ खाण्यास नकार दिला होता. यावेळी रणवीर बरार म्हणाले होते की, आम्ही खाल्लं तर आजारी पडू. तसंच फराह खानने उषा ताई ऐकत नसल्यामुळे फटकारलं होतं. आता तसंच काहीस चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं. पण कच्चं चिकनचा पदार्थ करणं या स्पर्धकाला चांगलाच महागात पडलं. कारण ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून या स्पर्धकाला थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

अभिजीत सावंतनंतर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून बाहेर झालेली स्पर्धक आयेशा झुलका आहे. ९० दशकातील बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा झुलका वाइल्ड कार्ड म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाली होती. पण १० दिवसांत आयेशाचा ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधला प्रवास संपला आहे. या आठवड्यात ब्लॅक अ‍ॅप्रनच्या चॅलेंजमध्ये दीपिका कक्कर, आयेशा आणि मिस्टर फैजू होता. तेव्हा दीपिकाने माशांचा, आयेशाने चिकनचा आणि फैजूने मटणचा पदार्थ बनवला होता. यावेळी परीक्षकांना आयेशाने केलेली मोहरीची चटणी आवडली. पण तिचं अर्धवट शिजवलेला चिकनचा पदार्थ परीक्षकांना अजिबात आवडला नाही. फराह खान, रणवीर बरार आणि विकास खन्नाने चिकन कच्चं राहिल्यामुळे आयेशाला एलिमिनेट करण्याचा निर्णय जाहीर केला.

दरम्यान, आयेशा झुलकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, १९९० मध्ये तिने दक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनबरोबर एका तेलुगू चित्रपटातून पदार्पण केलं होतं. आयेशाने तिच्या कारकिर्दीतील पहिला हिंदी चित्रपट सलमान खानबरोबर केला. दोघेही ‘कुर्बान’ चित्रपटात एकत्र दिसले होते. आयेशाने आजवरच्या २० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत तिने आमिर खान, सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार यांसारख्या अनेक सुपरस्टार्सबरोबर काम केलं आहे.

Story img Loader