रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात की नसतात हा कायमच एक वादातीत मुद्दा राहिला आहे. अनेकजण याबद्दल खुलेपणाणे भाष्य करताना दिसतात. काही दिवसांपुर्वी हेमा मालिनींनी हातात स्क्रिप्ट (संहिता) घेतल्याचा फोटो व्हायरल झाला होता. तसंच काही दिवसांपुर्वी टेरेन्स लुईसनेही रिअ‍ॅलिटी शोमध्ये काही गोष्टी स्क्रिप्टेड सांगितलं होतं. त्यावरून सोशल मीडियावर अनेक चर्चाही झाल्या. अशातच आता प्रसिद्ध बॉलीवूड गायकानेही रिअ‍ॅलिटी शोबद्दल खुलासा केला आहे. हा प्रसिद्ध गायक म्हणजे शान (Shaan).

‘वो लडकी है कहां’, ‘कुछ तो हुआ है’, ‘मैं ऐसा क्यूं हूं’ आणि अशा अनेक लोकप्रिय गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेला पार्श्वगायक शानने ‘द व्हॉइस इंडिया’ आणि ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स’ यांसारख्या अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे. अशातच विकी लालवानी यांच्याशी झालेल्या मुलाखतीत गायकाने गाण्याच्या रिअ‍ॅलिटी शोबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

रिअ‍ॅलिटी शोमध्ये सादरीकरण करणारे गायक उत्तम आवाज असूनही पुढे इंडस्ट्रीमध्ये दिसत नाहीत असा प्रश्न विचारला असता, शान म्हणाला की “मी हे फक्त बोलत नाही, तर मला खात्री आहे की, ते गाणी पुन्हा डब करत आहेत. शोमध्ये स्पर्धक स्टेजवर जे गातात ते प्रत्यक्षात वापरलं जात नाही. त्याऐवजी नंतर स्टुडिओमध्ये गाणं पुन्हा रेकॉर्ड करून एडिट केलं जातं.”

शानने पुढे सांगितलं की, “स्पर्धक स्टेजवर फक्त एकदाच लाईव्ह गातात. नंतर त्यांना स्टुडिओमध्ये घेऊन गेलं जातं आणि गाणं पुन्हा रेकॉर्ड केलं जातं. त्या रेकॉर्डिंगमध्ये अनेक सुधारणा केल्या जातात. त्यामुळे अंतिम सादरीकरण अगदी उत्तम दिसतं. पण ते वास्तव नसतं. सगळ्यांची कामगिरी उत्तम कशी असेल? हे शक्य नाही. सुरुवातीला जेव्हा या गोष्टी माझ्यावर लादल्या जात होत्या तेव्हा मला काही समस्या आल्या.”

रिअ‍ॅलिटी शोमध्ये गायक जे गाणं गातात ते प्रेक्षक म्हणून मनोरंजनात्मक वाटतं. पण त्यामागचं सत्य काही वेगळंच असतं. स्पर्धकाच्या एका गाण्यामध्ये इतकं एडिटींग असणं म्हणजे प्रेक्षकांची ही ती फसवणूकच आहे असं शानने म्हटलं आहे. दरम्यान, शानने सलमान खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सिकंदर’ या चित्रपटातील एका गाण्याला आपला आवाज दिला आहे