Amruta Deshmukh Prasad Jawade Engagement : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली जोडी म्हणून अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्याकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस’च्या घरात अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्यात घट्ट मैत्री झाली. त्यांची ही जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली होती. आता अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.
अमृताने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्या दोघांनीही साखरपुड्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी अमृता आणि प्रसादच्या हातात अंगठी पाहायला मिळत आहे. यावेळी प्रसादने गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला होता. तर अमृताने पांढऱ्या रंगाचा ट्रेडिनशल ड्रेस परिधान केला होता.
आणखी वाचा : स्वानंदी टिकेकरकडून साखरपुड्याची गुडन्यूज, मेहंदीचा पहिला फोटो समोर, म्हणाली “आम्हाला…”
“आम्ही साखरपुडा केला आहे. आम्ही दोघांनीही आयुष्यभर एकत्र एका टीममध्ये राहण्याचा निर्णय घेतलाय. तसेच आता आमच्या मार्गात येणारे कोणतेही कार्य पार पाडण्यास आम्ही सज्ज आहोत”, असे बिग बॉस स्टाईल कॅप्शन अमृता देशमुखने या फोटोला दिले आहे.
आणखी वाचा : “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”
अमृता आणि प्रसादने साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यानंतर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमृताने साखरपुड्याचे फोटो शेअर करताना त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. येत्या १८ नोव्हेंबरला अमृता आणि प्रसाद लग्नबंधनात अडकणार आहेत.
दरम्यान अमृता देशमुखने ‘तुमचं आमचं सेम असतं’ या मालिकेद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘फ्रेशर्स’, ‘देवा शप्पथ’, ‘मी तुझीच रे’, ‘आठशे खिडक्या नऊशे दार’ या मालिकेत विविध भूमिका साकारल्या होत्या. यानंतर ती अनेक मराठी चित्रपटातही ती झळकली.
अमृता देशमुखने काही महिन्यांपूर्वी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातही हजेरी लावली होती. त्यानंतरची ती प्रसिद्धीझोतात आली. मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यावर तिने रेडिओ जॉकी म्हणून प्रवास सुरू केला. रेडिओवरील ‘टॉकरवडी’ या तिच्या शोला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.