सूर्यादादा म्हटलं की, बहिणींसाठी कायम खंबीरपणे पाठीशी असणारा, तुळजावर नितांत प्रेम करणारा, वडिलांची काळजी घेणारा, मित्रांची साथ देणारा, असे व्यक्तिमत्त्व नकळत प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर येते. लाखात एक आमचा दादा या मालिकेतील सूर्यादादाचे हे पात्र आज घराघरांत पोहोचलेले दिसते. मालिकेबरोबरच पडद्यामागील काही क्षणही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. सोशल मीडियावर अनेक शूटिंगदरम्यानचे सीन शेअर केले जातात. आता ‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेतील एका अॅक्शन सीनचे शूटिंग कसे झाले, याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे.
पडद्यामागचे क्षण…
शंतनू शिंदे या अकाउंटवरून लाखात एक आमचा दादा मालिकेच्या शूटिंगचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सूर्या मारामारी करताना दिसत आहे. सत्यजितच्या घरासमोर तो त्यांच्या बॉडीगार्डबरोबर मारामारी करताना दिसतो. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर रागाचे भाव दिसत आहेत. मालिकेत पाहायला मिळालेला हा जबरदस्त मारामारीचा सीन कसा शूट झाला, हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना, मालिकेत सूर्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता नितीश चव्हाणलादेखील टॅग केले गेले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सूर्याची सर्वांत लहान बहीण भाग्याला तिच्या शाळेतील एक मुलगा त्रास देत होता. प्रोजेक्टच्या स्पर्धेसाठी गेल्यानंतर त्याने भाग्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. महत्त्वाचे म्हणजे हा सत्यजितचा भाचा आहे. सत्यजितबरोबर तुळजाचे लग्न ठरले होते. भाग्याचा व्हिडीओ त्या मुलाने काढला होता, हे समजल्यावर सूर्या सरनोबतांच्या बंगल्यावर गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यादरम्यान, त्यांचे बॉडीगार्ड व सूर्या यांच्यात मारामारी झाल्याचे पाहायला मिळाले.
याबरोबरच, तुळजाला शत्रूविरूद्ध ठोस पुरावा मिळाला असल्याचेदेखील पाहायला मिळाले. शाळेत मुलांना जो पोषण आहार मिळतो, तो सूर्याच्या घरात बनवला जातो. तो आहार घेतल्यानंतर गावातील मुले आजारी पडली होती. त्यासाठी सूर्याला पोलिसांकडून अटक केली होती. आता सूर्याची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र, पोषण आहारात शत्रूने कसलेतरी औषध टाकले होते, असा एक व्हिडीओ तुळजाच्या हाती लागला आहे. आता शत्रूला पोलिसांच्या हवाली करत सूर्याला तुळजा निर्दोष सिद्ध करू शकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.