‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) या मालिकेची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढताना दिसत आहे. मालिकेतील कलाकार त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या कलाकारांचे अनेक चाहते असल्याचे पाहायला मिळते. मालिकेच्या पुढच्या भागात काय होणार, याची नेहमीच प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली दिसते. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये एजे व लीलाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. आता या सीनमध्ये एजे व लीला डान्स करताना दिसत आहेत. या गाण्याच्या शूटिंग आधीचा एक व्हिडीओ नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
एजे-लीलाच्या रोमँटिक सीनचे शूटिंग
नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एजे व लीलाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, शूटिंगआधी एजे व लीला डान्सचा सराव करत आहेत. या सेटवर सुंदर सजावटदेखील केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे लीला एजेच्या प्रेमात पडली आहे. तिने तिच्या भावना उघडपणे सांगितल्या आहे. मात्र, त्यावेळी एजेने त्याच्या मनात तिच्याबद्दल कोणत्याही भावना नसल्याचे स्पष्ट सांगितले होते. तो त्याची पहिली पत्नी अंतरावर प्रेम करीत असल्याचे त्याने म्हटले होते. मात्र, एजे लीलाची वेळोवेळी मदत करतो, तिला पाठिंबा देतो आणि तिची काळजीही घेतो. एजे व लीलाची ही केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे दिसते, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून एजे लीलाच्या प्रेमात पडावा व त्याने त्याच्या मनातील भावना लीलाला सांगाव्यात, अशा आशयाच्या कमेंट्स प्रेक्षक सोशल मीडियावर करताना दिसतात.
सध्या एजे व लीला यांच्यातील भांडणे कमी झाल्याचे दिसत आहे. याबरोबरच, लीलाने संपूर्ण घराची जबाबदारी स्वत:वर घेतली असून तीने तिचा वेंधळेपणा कमी केला आहे. एजे व आजी तिला पाठिंबा देत असल्याचे दिसते. लीला विविध गोष्टींतून वेळोवेळी एजेप्रति तिचे प्रेम व्यक्त करताना दिसते. या सगळ्यात लीलाच्या तिन्ही सूना मात्र लीला कधी घराबाहेर जाईल याची वाट बघताना दिसतात. लीलाला घरातून बाहेर काढण्यासाठी त्या तिघीही अनेक प्रयत्न करतात. आता एजे व लीला यांच्यातील जवळीक पाहिल्यानंतर त्या काय करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आता एजे खरंच लीलाला प्रपोज करणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd