‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेत सातत्याने नवनवीन गोष्टी घडताना दिसतात. तुळजा-सूर्याची जोडी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसते. अनेकदा त्यांच्यात छोटी-मोठी भांडणे होताना दिसतात; पण ती क्षणिक असतात. एकमेकांची काळजी घेत असतानाच ते एकमेकांच्या घरातील सदस्यांची काळजीसुद्धा घेतात. तुळजा अनेक दिवसांपासून डॅडी व शत्रू हे खरे कसे आहेत, हे सूर्यासमोर आणण्यासाठी धडपडत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तिचे प्लॅन अयशस्वी होताना दिसतात. आता या सगळ्यात मालिकेत सूर्या व तुळजाचा एक डान्स नुकताच पाहायला मिळाला.

तुळजा-सूर्याचा मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर भन्नाट डान्स

मालिकेत दाखविल्याप्रमाणे सूर्या, तुळजा, तसेच सूर्याच्या बहिणी शत्रूच्या शेतात हुर्डा पार्टीला गेले आहेत. तेजूसुद्धा शत्रूबरोबर आली आहे. याचवेळी तुळजा व सूर्याने कल्पनेत ‘रानी माझ्या मळ्यामंदी…’ या लोकप्रिय गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. या गाण्यातील त्यांच्या वेशभूषेनेदेखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आता हे गाणे कसे शूट झाले, याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. गाण्याचे शूटिंग हे शेतात झाले असून, डोक्यावर भाजी, चूलीवरचा स्वयंपाक, बैलगाडी अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये गाण्याच्या शूटिंदरम्यान काय काय घडले, कशा प्रकारे शूटिंग पार पडले, हे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शंतनू शिंदे या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यामध्ये मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता नितीश चव्हाण याला टॅग करण्यात आले आहे. पडद्यामागचे हे क्षण पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुळजा सूर्याबरोबर तिच्या माहेरी गेली होती. यावेळी शत्रूचे सत्य समोर आणण्याची तिने योजना बनवली होती. त्यासाठी तिने तेजूची मदत घ्यायचे ठरवले. मात्र, ज्यावेळी तिने तेजूला शाळेतील मुलांना विषबाधा होण्यात सूर्या नाही, तर शत्रू जबाबदार असल्याचे सांगितले, त्यावेळी ते शत्रूने ऐकले. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज असणारा पेनड्राइव्ह आणण्यासाठी शत्रूने तेजूची मदत घेतली. त्यामुळे तुळजाचा प्लॅन अयशस्वी ठरला. या सगळ्यानंतर तुळजा नाराज असल्याचे पाहायला मिळाले. आता मालिकेत पुढे काय होणार, तुळजा कधी शत्रूचे सत्य सर्वांसमोर उघड करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader