Ankita Walawalkar Wedding : अंकिता वालावलकर व कुणाल भगत यांचा शाही विवाहसोहळा आज ( १६ फेब्रुवारी ) कुडाळ येथे पार पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘कोकण हार्टेड गर्ल’च्या लग्नासाठी अनेक सेलिब्रिटी व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स कोकणात पोहोचले होते. अखेर अंकिता व कुणालने आज साता जन्माची गाठ बांधत आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वातून अंकिता वालावलकरवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
अंकिताच्या लग्नाला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक तसेच लोकप्रिय इन्फ्लुएन्सर्सनी उपस्थिती लावली होती. याशिवाय ‘कोकण हार्टेड गर्ल’ने राजकीय वर्तुळातील काही मान्यवरांना सुद्धा तिच्या लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. विद्यमान आमदार व कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी अंकिता व कुणाल यांच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावत या दोघांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवदाम्पत्यासह फोटो शेअर करत नितेश राणेंनी यांनी खास पोस्ट लिहिली आहे.
नितेश राणे अंकिता व कुणालच्या रिसेप्शनला उपस्थित होते. ते लिहितात, “सिंधुदुर्गाची सुकन्या ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिच्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यास पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.”
सध्या संपूर्ण कलाविश्वातून अंकिता व कुणाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान, अंकिताचा नवरा कुणाल भगतबद्दल सांगायचं झालं. तर तो मुळचा शहापूर अलिबागचा आहे. या दोघांची भेट ‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्याला झाली होती. कुणालने करणच्या साथीने ‘येक नंबर या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. याशिवाय ‘लक्ष्मी निवास’, ‘तुला जपणार आहे’ या मालिकांच्या शीर्षक गीतांना सुद्धा कुणालने संगीत दिलेलं आहे.