आजही खासकरून ९० च्या काळातील मुलं कार्टून नेटवर्कचं नाव विसरलेली नाहीत. कित्येकांचं बालपण रम्य आणि अविस्मरणीय बनवण्यात या कार्टून नेटवर्कचा सिंहाचा वाटा आहे. आजही कित्येक प्रेक्षक ‘टॉम अँड जेरी’, ‘रीची रिच’, ‘बेन १०’, ‘पॉवरपफ गर्ल्स’ अशा कार्टून्सची आवर्जून आठवण काढतात. पण मध्यंतरी कार्टून नेटवर्क आणि वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओमध्ये करार होणार असल्याची बातमी पसरली होती. या बातमीनंतर ‘कार्टून नेटवर्क’ बंद होणार असल्याच्या अफवा पसरू लागल्या आणि त्यामुळे सोशल मीडियावर #RIPCartoonNetwork हे हॅशटॅग चांगलंच व्हायरल झालं.
नुकतंच पुन्हा हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसलं आणि ते पाहून कार्टून नेटवर्कच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन याला उत्तर देण्यात आलं. कार्टून नेटवर्कने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “आम्ही अजून संपलेलो नाहीत. आम्ही फक्त आमची ३० वर्षं पूर्ण केली आहेत. आम्ही कुठेही जात नाही आहोत. आम्ही आणखीन नवीन कार्टून्सच्या माध्यमातून तुमच्या घरातील मुलांचं कायम मनोरंजन करत राहू.” असं ट्वीट करत ट्रेंड होणाऱ्या हॅशटॅगला त्यांनी उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने केलं ‘कांतारा’ चित्रपटाचं कौतुक; म्हणाला, “उत्तम संकल्पना आणि…”
कार्टून नेटवर्क बंद होणार ही बातमी जशी सोशल मीडियावर व्हायरल झाली तसे कित्येक चाहत्यांनी हे हॅशटॅग वापरुन कार्टून नेटवर्कला श्रद्धांजली वाहिली. जेव्हा या दोन्ही स्टुडिओजच्या विलिनीकरणाची बातमी समोर आली तेव्हाच वॉर्नर ब्रदर्सनी त्यांच्या २६% कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचंही स्पष्ट झालं होतं. या विलीनिकरणाच्या बातमीमुळे सोशल मीडियावर चांगलीच हवा निर्माण करण्यात आली.
कार्टून नेटवर्कने केलेलं हे ट्वीट पाहून कित्येकांचा जीव भांड्यात पडला आहे. त्यांच्या या ट्वीटलाही प्रचंड प्रतिसाद मिळत असून चाहत्यांनी त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे, अर्थात या विलिनीकरणाबद्दल अजूनही कोणती ठोस माहीती हाती लागली नसली तरी कार्टून नेटवर्कच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केलेलं ट्वीट पाहून हे नक्की झालं की ‘कार्टून नेटवर्क’ काही इतक्यात बंद होणार नाही.