एका सीबीआय अधिकाऱ्याची लेक, जिने आयएएस अधिकारी व्हायचं स्वप्न पाहिलं होतं, ती आयुष्यात घडलेल्या प्रसंगाना सामोरी गेली अन् अभिनेत्री झाली. गेली २५ वर्षे ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तिच्या नावावर बॉलीवूडमधील सर्वाधिक करणारा एक चित्रपट आहे. टीव्हीवरील संस्कारी सून बनून लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीने तब्बल १७ मिनिटांचा रोमँटिक सीन दिला होता, ज्याची खूप चर्चा झाली होती. ही अभिनेत्री आता ५१ वर्षांची असून अजूनही अविवाहित आहे.
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती म्हणजे साक्षी तंवर होय. तिचा जन्म राजस्थानमधील अलवर इथं झाला होता. तिचे वडील निवृत्त सीबीआय अधिकारी राजेंद्र सिंह तंवर होते. तिने दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. साक्षीने एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सेल्स ट्रेनी म्हणूनही काही काळ काम केलं होतं. तिचा पहिला पगार ९०० रुपये होता आणि त्या पैशांतून साड्या घेतल्याचं साक्षीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. ती कॉलेजमध्ये त्या ड्रॅमॅटिक सोसायटीची सचिव आणि अध्यक्ष होती. साक्षीला आयएएस अधिकारी व्हायचं होतं, पण ती अभिनेत्री झाली.
साक्षीने १९९८ मध्ये ‘अलबेला सूर मेला’ द्वारे टीव्हीवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर २००० मध्ये ती एकता कपूरच्या लोकप्रिय शो ‘कहानी घर घर की’ मध्ये पार्वती अग्रवालच्या भूमिकेत दिसली, या मालिकेने साक्षीला खूप लोकप्रियता मिळवून दिली. नंतर तिने इतर मालिका केल्या. २०११ ते २०१४ यादरम्यान तिने ‘बडे अच्छे लगते हैं’ मध्ये राम कपूरबरोबर काम केलं. यात तिने प्रिया कपूरची भूमिका साकारून पुन्हा लोकांची मनं जिंकली. राम व साक्षी यांनी या मालिकेत अनेक रोमँटिक सीन केले होते. त्यापैकी एक सीन १७ मिनिटांचा होता, यात दोघे एकमेकांना किस करतानाही दाखवण्यात आले होते. त्यांच्या या सीनची खूप चर्चा झाली होती.
साक्षी तंवर ही टीव्हीवरील आघाडीची अभिनेत्री आहे. ती भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी एक आहे.साक्षीने ‘कॉफी हाऊस’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं, पण हा चित्रपट यशस्वी झाला नाही, मग तिने ‘आतंकवादी अंकल’, ‘शोर से शुरूआत’ यांसारख्या चित्रपटात काम केलं. हे चित्रपटही फ्लॉप झाले, त्यानंतर तिने तिच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट केला. तिने बॉलीवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसह ‘दंगल’ हा बॉलीवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट केला. जगभरात २००० कोटी रुपये कमावणाऱ्या या चित्रपटात साक्षी आमिरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.
साक्षीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास ती अविवाहित आहे. आता ५१ वर्षाच्या असलेल्या साक्षीने वयाच्या ४५ व्या वर्षी दित्या नावाची एक मुलगी दत्तक घेतली होती. ती तिच्या मुलीबरोबर मुंबईत राहते.