Celebrity MasterChef: ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमात एकूण ११ कलाकार सहभागी झाले आहेत. या ११ कलाकारांमध्ये विविध पदार्थ बनवण्याची स्पर्धा सोमवार ते शक्रवार पाहायला मिळते. यावेळी कोणत्या ना कोणत्या कारणांवरून कलाकारांमध्ये वाद होतात. नुकत्याच झालेल्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या भागात दीपिका कक्कड आणि निक्की तांबोळी भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या.
४ फेब्रुवारीच्या भागात कलाकारांना आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आठवणीत खास पदार्थ बनवायचे होते. त्याआधी कलाकारांनी काही खास फोटो दाखवण्यात आले. तेव्हा निक्कीला तिच्या बालपणीचा फोटो दाखवला. तो फोटो पाहून निक्की तांबोळीचे अश्रू अनावर झाले. तेव्हा फराह खानने विचारलं, “निक्की, तुझ्याबरोबर कोण आहे?” तेव्हा निक्की रडत म्हणाली की, हा माझा भाऊ आहे. जो आता या जगात नाहीये.
पुढे फराहने विचारलं की, हा किती वर्षांचा होता? निक्की म्हणाली, “तो माझ्यापेक्षा तीन वर्षांची मोठा होता. वयाच्या २९व्या वर्षी त्याचं निधन झालं.” नंतर फराहने विचारलं, “केव्हा?” तर निक्की म्हणाली की, तीन वर्षांपूर्वी. त्यानंतर फराह खानने विचारलं, कोरोनामध्ये का? त्यावर निक्की म्हणाली, “हो. मल्टीपल ऑर्गन फेल्यूअर (अनेक अवयव निकामी होणे) झालं होतं.” “तुझ्या भावाचं नाव काय होतं?, असं दिग्दर्शिकेने विचारलं. तर निक्कीने सांगितलं, “जतिन”
यावेळी निक्की खूप रडत होती. त्यामुळे फराह खान तिला समजावत म्हणाली, “जतिन जिथे कुठे आहे, त्याचे आशीर्वाद तुझ्यावर सदैव आहेत. त्याची इच्छा असणार तू नेहमी आनंदी राहावं. तुझ्या मनात काय भावना असतील हे मला माहीत आहे. मी गेल्यावर्षी माझ्या आईला गमावलं. पण, ती माझ्याबरोबर कायम आहे, असाच मी विचार करते. त्यामुळे आपण विसरून पुढे जायला पाहिजे.” तेव्हा निक्की म्हणाली, “मी विसरू शकत नाहीये. मी आई-वडिलांसमोर बसून रडू शकली नाहीये. कारण मी रडली तर ते पण रडतील.” मग विकास खन्ना म्हणाला, “मला वाटतं, त्याच्या आठवणी आणि प्रेम हे आपल्या पाठीशी ठेऊन पुढे जायला पाहिजे.”
दरम्यान, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमात लोकप्रिय दिग्दर्शिका, निर्माती फराह खान, रणवीर बरार आणि विकास खन्ना परीक्षकाची धुरा सांभाळत आहे. यामध्ये तेजस्वी प्रकाश, दीपिका कक्कड, गौरव खन्ना, उषा नाडकर्णी, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, मिस्टर फैजू, अर्चना गौतम, राजीव अदातिया, चंदन प्रभाकर आणि कबिता सिंग हे ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चे स्पर्धक आहेत. माहितीनुसार, या कार्यक्रमात निक्कीला प्रत्येक आठवड्यासाठी १.५ लाख मानधन दिलं जात आहे.