Tejasswi Prakash And Karan Kundra Wedding : हिंदी टेलिव्हिजनविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे तेजस्वी प्रकाश व करण कुंद्रा. ‘बिग बॉस’च्या १५व्या पर्वात ही जोडी जमली. ‘बिग बॉस’मध्येच करणने तेजस्वीला प्रपोज केलं. या जोडीचा आता मोठा चाहता वर्ग आहे. तेजस्वी-करणचे व्हिडीओ, फोटो नेहमी व्हायरल होतं असतात. यंदा ही लोकप्रिय जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. याच कारण आहे तेजस्वी प्रकाशची आई.
कुकिंग रिअॅलिटी शो ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये अलीकडेच तेजस्वी प्रकाशची आई उपस्थित राहिली होती. यावेळी तेजस्वीच्या आई सुरुवातीची संघर्षमय परिस्थिती व अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल बोलली. तेजस्वीचे वडील जेव्हा परदेशात होते तेव्हा तिच्या आईने एकटीने तेजस्वी व तिच्या भावाला सांभाळलं. तेजस्वीसाठी तिच्या आईने हातातल्या सोन्याच्या बांगड्या घाण ठेवल्या होत्या. अभिनेत्रीला गाडी घेण्यासाठीदेखील तिच्या आईने खूप धडपड केली होते. हे सांगताना तेजस्वीची आई खूप भावुक झाली होती. त्यानंतर फराह खानने तेजस्वीच्या आईला तिच्या लग्नाबद्दल विचारलं.
फराह खानने विचारलं, “तेजस्वीचं लग्न कधी करणार आहे?” यावर तेजस्वीची आई म्हणाली, “यंदाच.” आईचं हे उत्तर ऐकून तेजस्वी आश्चर्य चकीत झाली. तेव्हाच फराहने तेजस्वीला चिडवत तिच्या आईला विचारलं की, मुलाचं नाव करणचं आहे ना? यावर तेजस्वीच्या आईने हसत होकार दिला. हे ऐकताच इतर स्पर्धकांनी व परीक्षकांनी टाळ्या वाजवल्या.
‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधील तेजस्वी प्रकाशच्या आईचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर करण व तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावण पसरलं आहे. तर दुसऱ्या बाजूला काही जण म्हणतं आहेत की, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाचा टीआरपी वाढवण्यासाठी हे सगळं केलं आहे. हा पीआर स्टंट आहे.
दरम्यान, करण कुंद्रा हा तेजस्वी प्रकाशपेक्षा ९ वर्षांनी मोठा आहे. करणचं वय ४० असून तेजस्वी ३१ वर्षांची आहे. दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तेजस्वी सध्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये नवनवीन चविष्ट पदार्थ बनवून परीक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे. तसंच करण आता ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’मध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’मधून अब्दू रोजिकची एक्झिट झाली. त्याचीच जागा करण कुंद्रा घेणार आहे. करण कुंद्राला ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’मध्ये पाहून भारती सिंह भावुक झाल्याचा प्रोमो व्हायरल झाला आहे.