Celebrity MasterChef: ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम सध्या खूप चर्चेत आहे. नुकताच दीपिका कक्करने हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला. चार वर्षांनंतर दीपिका कक्करने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या माध्यमातून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. पण, होळीच्या स्पेशल भागात दीपिकाने डाव्या खांद्याची दुखापत जास्त झाल्यामुळे हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय जाहीर झाला. ज्यामुळे इतर स्पर्धकांसह परीक्षकांना धक्काच बसला.

आता ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये गौरव खन्ना, निक्की तांबोळी, तेजस्वी प्रकाश, उषा नाडकर्णी, राजीव अडातिया, फैजल शेख आणि अर्चना गौतम हे स्पर्धक राहिले आहेत. येत्या काळात या सातजणांमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. नुकताच एक टास्क झाला, ज्यामध्ये उषा नाडकर्णी हतबल होऊन भावुक झाल्या. त्यानंतर गौरव खन्ना उषा नाडकर्णींना मदत करताना दिसला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या नुकत्याच झालेल्या भागामध्ये स्पर्धकांना वन-पॉट चॅलेंज दिलं गेलं होतं. म्हणजेच एकाच भांड्यात पदार्थ बनवायचा होता. हा टास्क ऐकून स्पर्धक हैराण झाले. एकाच भांड्यात कसा पदार्थ बनवायचा? हा प्रश्न स्पर्धकांसमोर होता. याच टास्कमध्ये उषा नाडकर्णी रडताना पाहायला मिळाल्या. वन-पॉट टास्कमध्ये पुढे पदार्थांची आदलाबदल करायला सांगितली. उषा नाडकर्णी यांच्या केलेला पदार्थबरोबर गौरव खन्नाने आदलाबदल केली. त्यामुळे गौरव जो पदार्थ करत होता, तोच पदार्थ उषा ताईंना पुढे करायचा होता. पण, गौरव कोणता पदार्थ बनवतोय? हेच त्यांना समजत नव्हतं. या टास्कमध्ये त्या पूर्णपणे हतबल होऊन रडायला लागल्या. तेव्हा गौरवने उषा नाडकर्णींना शांत केलं. तो पदार्थ पुढे कशाप्रकारे करायचा हे समजवलं. उषा नाडकर्णी व गौरव खन्नाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याचं कौतुक केलं जात आहे.

Video Credit: @terideewanix.__ Instagram

दरम्यान, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ला दीपिका कक्कर रामराम करणार असल्याची माहिती महिन्याभरापूर्वी उषा नाडकर्णी यांनी दिली होती. आता दीपिका कक्करच्या जागी ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे झळकणार असल्याचं म्हटलं आहे. शिवची ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. यासाठी त्याला विचारणा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Story img Loader