सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत. काही जण विविध विषयांवर त्यांची मतं मांडतात, काही जण त्यांच्या रोजच्या आयुष्याविषयी सांगतात, तर काही जण डान्स, गाणी आणि इतर कलागुणांद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकून घेतात. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून त्यांना ओळखले जाते. सोशल मीडियावर त्यांचे लाखो चाहते असल्याचे दिसते. आता असेच काही इन्फ्ल्युएन्सर झी मराठी वाहिनीवरील नवीन रिॲलिटी शोमध्ये दिसणार असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘चल भावा सिटीत’ असे या कार्यक्रमाचे नाव असून यामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार आहे, हे आता समोर आले आहे. यापैकी एक अनुश्री माने आहे. अनुश्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अनुश्रीने तिचा ड्रीम बॉय कसा हवा याबद्दल वक्तव्य केले आहे.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती विविध प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. एक सोशल मीडिया ॲप कायमचं डिलिट करायचं असेल तर ते कोणतं करशील? यावर अनुश्रीने स्नॅपचॅट असे उत्तर दिले. अनुश्रीला राग आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी कोणती काळजी घ्यावी? यावर बोलताना अनुश्रीने म्हटले, “मला जेव्हा राग येतो, तेव्हा मी जे बोलत असते त्यावर उलट उत्तर न देता, मी जे बोलत असते ते करावं.” पुढे अनुश्रीला विचारण्यात आले की, फेमस झाल्यानंतर तिला कोणत्या गोष्टी करता येत नाहीयेत? यावर बोलताना तिने म्हटले, “आपण रस्त्यावर जातो आणि पाणीपुरी खातो, ते मी करू शकत नाही. मला पाणीपुरी खूप आवडते.” सोशल मीडिया नसता तर अनुश्री कोण असती? यावर बोलताना तिने म्हटले, “मी आता शिक्षण घेत असते आणि पार्ट टाइम जॉब करत असते.” पुढे तिला विचारण्यात आले की अनुश्रीचा ड्रीम बॉय कसा असेल? गावाकडचा रांगडा गडी की सिटीमधला स्मार्ट बॉय? यावर अनुश्री मानेने म्हटले, “गावाकडचा रांगडा गडी सिटीमध्ये येऊन स्मार्ट झालेला”, असे उत्तर दिले.

अनुश्री माने सोशल मीडियावरील रील्स, ब्लॉगिंगबरोबरच तिच्या डान्ससाठीदेखील ओळखली जाते. तिच्या काही म्युझिक व्हिडीओंना प्रेक्षकांची पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले. आता ती ‘चल भावा सिटी’ या झी मराठीवरील नवीन कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामधून ती प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणे उत्सुकतेचे आहे. अभिनेत्री गायत्री दातारदेखील या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. १५ मार्च २०२५ पासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader