Zee Marathi Chal Bhava Cityt New Reality Show : ‘झी मराठी’ वाहिनीवर १५ मार्चपासून ‘चल भावा सिटीत’ हा नवीन कार्यक्रम सुरू झालेला आहे. या कार्यक्रमात १३ सिटीसुंदरी आणि १२ गावरान ब्रो सहभागी झाले आहेत. नुकताच या स्पर्धकांना सुपरमार्केट टास्क देण्यात आला होता. यादरम्यान शहरातल्या मुलींची गावरान जीवनशैली जगणाऱ्या मुलांशी संवाद साधताना धांदल उडाल्याचं पाहायला मिळालं.

सुपरमार्केटमध्ये गेल्यावर स्पर्धक मुलींच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती. त्यामुळे गावातील मुलांना नेमकी कोणती वस्तू घ्यायचीये हे सांगताना या तरुणींची चिडचिड झाल्याचं पाहायला मिळालं. एका स्पर्धक मुलाने कोथिंबीर समजून तर चक्क पार्सलेची जुडी आणली होती. यावरून शहरातल्या मुली आणि या गावाकडच्या मुलांमध्ये हा टास्क खेळताना अजिबातच ताळमेळ नव्हता हे स्पष्ट होतं. आता येत्या भागात या स्पर्धकांना नवीन टास्क देण्यात येणार आहे.

‘चल भावा सिटीत’ या कार्यक्रमात ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा एजे म्हणजेच राकेश बापट एन्ट्री घेणार आहे. आता सिटीत एक वेगळाच टास्क रंगणार आहे. यासाठी सगळे गावरान ब्रो पहिल्यांदाच सुटाबूटात सजणार आहेत. आता या टास्कसाठी हॉटेलमध्ये गेल्यावर काय राडा होणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

‘झी मराठी’ने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आलिशान हॉटेल आणि इंग्रजी बोलणारी वेट्रेस पाहून गावरान मुलांची धांदल उडाल्याचं पाहायला मिळालं. काही मुलं या वेट्रेसला ‘ओ बाई’ म्हणून आवाज देत होती. तर, काही गावरान ब्रोंनी या वेट्रेसला ‘मराठीत बोला ना…’ अशी विनंती केल्याचं पाहायला मिळतंय. या टास्कदरम्यान मुलींनी जराही बोलायचं नाही असा नियम होता. त्यामुळे हा टास्क पूर्णपणे मुलांना खेळायचा आहे.

आजवर गावात राहिल्याने यापैकी अनेक जणांसाठी काट्याच्या चमच्याने जेवण जेवणं, चॉपस्टिकने विदेशी पदार्थ खाणं या गोष्टी नवीन होत्या. याशिवाय या टास्कमध्ये शेवटी इमोशनल ड्रामा देखील पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, श्रेयस तळपदे होस्ट करत असलेला ‘चल भावा सिटीत’ हा नवीन शो रोज रात्री ९:३० वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केला जातो.

Story img Loader