नाटक असो किंवा चित्रपट कुशल बद्रिकेने कायम प्रेक्षकांशी एक वेगळं नातं जोडून ठेवलं आहे. गेली अनेक वर्षे तो ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. सध्या अभिनेता हिंदी शोमध्ये आपल्या विनोदाचा ठसा उमटवत आहे. कुशलच्या सोशल मीडिया पोस्ट चांगल्याच चर्चेत असतात. रंगपंचमीच्या सणानिमित्त त्याने खास बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता कुशल बद्रिकेने कुटुंबीयांबरोबर रंगपंचमी खेळतानाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने बालपणीची आठवण सांगितली आहे. कुशल लिहितो, “माझ्या आयुष्याची होळी गेली कित्येक वर्ष ‘फ्लॅट’ संस्कृतीत पेटत आहे, पण माझी खरी होळी रंगली ती माझ्या बालपणी आमच्या ‘चाळीत’.”

हेही वाचा : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेता झाला बाबा; होळीच्या सणाला दिली गुडन्यूज; म्हणाला, “आमच्या आयुष्यात…”

कुशल पुढे लिहितो, “माझे पप्पा पहाटे चारला उठायचे आणि दीड-दोनशे फुगे पाण्याने भरून ठेवायचे. मग रंग भरल्या पिचकारीची बंदूक आणि फुग्यांचे बॉम्ब घेऊन आमची वानरसेना दिसेल त्याच्यावर तुटून पडायची. त्यावेळी जातीचे रंग थोडे फिकट आणि होळीचे रंग थोडे गडद होते, म्हणून कदाचित जगण्यात जे रंग उतरले त्याने अख्खं आयुष्य रंगीत करुन टाकलं. आता मुलांना फुगे भरून देताना गाठी मारून गुलाबी झालेलं ‘पप्पांचं बोट’ आपल्याच हाताला फुटलंय असं वाटतं आणि आता होळीत आपल्याला फुगे भरून देणारं कुणी नाही ही जाणीव ठुसठुसत राहते बोटभर! Happy Holi”

हेही वाचा : “१२ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी…”, सुप्रिया पिळगांवकरांची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाल्या…

दरम्यान, कुशल बद्रिकेने याआधी त्याची पत्नी पेटत्या होळीतून नारळ काढत असल्याचा खास व्हिडीओ देखील शेअर केला होता. अभिनेत्याच्या या होळीनिमित्त शेअर केलेल्या दोन्ही पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो सोनी टिव्हीवरील ‘मॅडनेस मचाऐंगे’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chala hava yeu dya fame kushal badrike holi celebration with family shares post sva 00