झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो. या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अंकुर वाढवे. अभिनय व मेहनतीच्या जोरावर अंकुरने शारीरिक व्यंगावर मात केली. अंकुरने सोशल मीडियाद्वारे त्याच्या पत्नीबाबत खास पोस्ट शेअर केली आहे.
अंकुर त्याच्या पत्नीसह सुखाचा संसार करत आहे. त्याची लव्हस्टोरी काहीशी हटके आहे. याचबाबत त्याने पत्नीबरोबरचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करत सांगितलं. तो म्हणाला, “आयुष्यात कधीही प्रेयसी भेटली नाही. एक भेटली पण आंतरजातीय म्हणून लग्नासाठी नकार दिला. यानंतर मी निर्णय घेतला कधीही लग्न करायचं नाही. आणि केलं तर फक्त प्रेम विवाह करणार.”
“कारण माझं असं म्हणणं होतं की, अरेंज मॅरेजमध्ये कदाचित मुली आई-बाबांच्या दबावाखाली हो म्हणतात आणि प्रेमविवाहसाठी मला कोणी हो बोलणार नाही हेही तेवढंच सत्य. कारण प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला राजकुमार ठरलेला असतो त्यात मी बसत नाही. म्हणून ठरवलं होतं लग्न न करणंच ठीक आहे. निकिताचं स्थळ आलं आणि तिला न बोलता न भेटता हो बोललो. त्याचं कारणं अस की ती माझ्या मामाची मुलगी. तिला माझ्याबद्दल काही गोष्टी माहित होत्या.”
पुढे तो म्हणाला, “लग्न ठरण्यापूर्वी मी तिला आधी एक कॉल केला. तिला माझ्या सवई (सगळ्या) आणि पहिली आणि शेवटची गर्लफ्रेंज बद्दलही स्पष्ट बोललो. तरीही ती हो बोलली आणि मला जशी हवी होती तशीच गर्लफ्रेंड भेटली. मित्र आहेत असतील पण किमान आतापर्यंत तरी मी तुला आणि तू मला कधीच अंधारात ठेवत नाही. कदाचीत हे प्रेम विवाहमध्ये मिळालं नसतं I LOVE YOU FOREVER बायको”. ही पोस्ट व्हॅलेंटाइन डेची असली तरी अंकुरने सांगितलेली त्याची लव्हस्टोरी फारच कमालीची आहे.