‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील कलाकारांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतं. त्यातीलच एक कलाकार म्हणजे योगेश शिरसाट. योगेशने आजवर या कार्यक्रमामध्ये विविध भूमिका साकारल्या. रुपेरी पडद्यावरही त्याने साकारलेल्या भूमिकांचं कौतुक झालं. आता योगेशच्या मुलाने ‘चला हवा येऊ द्या’मध्ये प्रवेश केला आहे. याचबाबत योगेशने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं.
‘चला हवा येऊ द्या – लहान तोंडी मोठा घास’ हे नवीन पर्व १५ मे पासून सुरू झालं आहे. या नव्या पर्वामध्ये लहान मुलं प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसत आहेत. आता या नव्या पर्वाच्या निमित्ताने योगेशचा मुलगा प्रख्यात शिरसाटने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. याचबाबत ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅननला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगेशला विचारण्यात आलं.
“तू ज्या मंचावर काम करतो त्याच मंचावर स्वतःच्या मुलाला पाहून कसं वाटतं?” असा प्रश्न योगेशला विचारण्यात आला. यावेळी त्याने त्याच्या वडिलांबाबत सांगितलेला एक प्रसंग डोळ्यात पाणी आणणारा होता. योगेश म्हणाला, “कोणत्याही वडिलांसाठी ही अभिमानास्पदच गोष्ट असते. माझा एक अनुभव मी सगळ्यांना सांगतो. तो म्हणजे, माझ्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला होता”.
आणखी वाचा – वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला आयुष्मान खुराना, आईचा हात हातात धरत म्हणाला, “वडिलांसारखं…”
“यानंतर मी बाबांना एकदा मी ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर बोलावलं होतं. अर्धांगवायूचा परिणाम त्यांच्या एका डोळ्यावर झाला होता. माझं शूट, इतर करत असलेलं कौतुक त्यांनी ऐकलं आणि त्यांचा डोळा पूर्वीसारखा झाला. हिच कलेची खरी ताकद असते. हिच ताकद माझ्या पुढच्या पिढीमध्ये येते याचा खरंच आनंद आहे. मला माझ्या मुलाला मंचावर बघताना अगदी गहिवरुन येतं”. योगेशला त्याच्या मुलाला अभिनय करताना पाहून आनंद गगनात मावेनासा झाला होता.