वडील अन् लेकीचे नाते हे जगावेगळे नाते असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, माया, वात्सल्य आणि आपुलकी असते. वडील आयुष्यभर आपल्या मुलीला फुलाप्रमाणे जपतात आणि एक दिवस तीच लाडकी लेक जेव्हा सासरी जाते, तेव्हा सर्वात जास्त दु:ख हे वडिलांना होतं. लेकीच्या लग्नाच्या विचारामुळे अनेक वडील काळजीत असतात. आपल्या लेकींविषयी आणि त्यांच्या लग्नाविषयी जशी एका सामान्य बापाला काळजी असते, तशीच काळजी विनोदवीर भाऊ कदम यांनादेखील आहे. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे सर्वांचे लाडके अभिनेते म्हणजे भाऊ कदम. ‘चला हवा येऊ द्या’ व ‘फू बाई फू’ या कार्यक्रमांनी भाऊ कदम या नावाचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. भाऊ कदम यांना तीन मुली असून संचिता, समृद्धी व मृण्मयी अशी त्यांची नावे आहेत.

आपल्या मुलींच्या लग्नाचा विचार हा एखाद्या बापाला अस्वस्थ करत असतो आणि याच विचाराने भाऊ कदम हेदेखील अस्वस्थ आहेत. याच अस्वस्थेतून त्यांनी मुलींच्या लग्नात आपण जाणार नसल्याचे म्हटलं आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “एखाद्या माणसाला जेव्हा एक मुलगी असते, तिचं जेव्हा लग्न होतं आणि ती सासरी जाते, तेव्हा त्या मुलीच्या बापाला काय वाटतं हे एका मुलीसाठी ठीक आहे, पण माझ्या तर तीन-तीन मुली आहेत. म्हणजे प्रत्येकवेळी मी किती रडायचं… मला तर वाटणारच नाही की, त्यांनी कधी जावं. त्यांनी कायम माझ्या जवळच राहावं असंच मला वाटतं. त्या कुठे गेल्या नाही पाहिजेत.”

यापुढे भाऊ कदम असं म्हणाले की, “त्यांच्या लग्नात काय होईल माहीत नाही. त्यांच्या लग्नात मी एक तर नाटकाला तरी जाईन किंवा शूटिंगला तरी जाईन किंवा मी कुठे तरी बिझी (व्यग्र) आहे असं म्हणेन. मग नंतर हवं तर त्यांच्या घरी (सासरी) जाईन. त्यांच्याबद्दल माझ्या डोक्यात कधी कधी असं येतं की, मी तो विचारच करत नाही. त्यांच्या विचाराने मी ‘दाटून कंठ येतो’ हे गाणं गाऊच शकत नाही. एकदा मी ते गाणं गात होतो, पण गाता-गाता मी ते गाणं मध्येच थांबवलं. गाण्याचे शब्द आणि ते सगळं मला जाणवायला लागलं, त्यामुळे मी मुलींच्या लग्नाचा विचारच करू शकत नाही.” यावेळी भाऊ कदम हे काहीसे भावुक झाल्याचेही पाहायला मिळाले.

दरम्यान, अभिनेते भाऊ कदम यांनी आजवर केवळ आपल्या विनोदीच नाही तर गंभीर भूमिकांनीदेखील प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे. भाऊ कदम हे ‘चला हवा येऊ द्या’, ‘फू बाई फू’ या कार्यक्रमांशिवाय ‘हाफ तिकीट’, ‘नशीबवान’, ‘सायकल’, ‘घे डबल’, ‘व्हीआयपी गाढव’, ‘पांडू’ अशा अनेक चित्रपटांतही झळकले आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ हा शो बंद झाल्यानंतर ते कलर्स वाहिनीवरच्या ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

Story img Loader