यंदाचा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा चांगलाच चर्चेत आहे. २५ वर्षे पूर्ण झाल्याने जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या सोहळ्याची झलक सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमधून पाहायला मिळत आहे. पुरस्कार, दिग्गजांचा सन्मान यांबरोबरच कलाकारांचे डान्स पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमात विनोदाचा तडकादेखील लागल्याचे पाहायला मिळत आहे. श्रेया बुगडे(Shreya Bugde), गौरव मोरे व ओंकार भोजने(onkar bhojane) हे कलाकार सर्वांना खळखळवून हसवत असल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आता हे तीनही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेया बुगडे ही अभिनेत्री तिच्या विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ओळखली जाते. तिने चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमात अनेकविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्याआधी ती फु बाई फू या कार्यक्रमात काम करताना दिसली होती. तर, ओंकार भोजने व गौरव मोरे या अभिनेत्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार २०२५ निमित्ताने हे कलाकार एकत्र काम करताना दिसत आहेत. आता या कलाकारांनी याविषयी त्यांचा अनुभव सांगितला आहे.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री श्रेया बुगडे, ओंकार भोजने व गौरव मोरे दिसत आहेत. श्रेया म्हणते, “तुम्ही आम्हा तिघांना एकत्र बघून आश्चर्यचकित झाला आहात. कारण- तुम्ही पहिल्यांदाच आम्हा तिघांना एकत्र बघत आहात.” त्यानंतर त्यांच्या एकत्र येण्याचे कारण सांगत ओंकार भोजने म्हणतो, “आपल्या ‘झी चित्र गौरव’ला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. ‘झी चित्र गौरव’ हा सोहळा आपण सगळेच एकत्र मिळून साजरा करतोय. तर, या सोहळ्याच्या निमित्तानं आम्हा दोघांना पहिल्यांदाच या कुटुंबात, इतक्या मोठ्या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे आम्ही खूप उत्सुक आहोत. श्रेयाताईंची साथ असल्यानं जे दडपण होतं, ते पहिल्याच तालमीच्या तासाला नाहीसं झालं.

श्रेयाने गौरव मोरे व ओंकार भोजने यांच्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल म्हटले, “त्यांच्या दोघांची झी परिवाराबरोबर काम करण्याची पहिलीच वेळ आहे. पण, माझीसुद्धा त्यांच्याबरोबर काम करण्याची पहिली वेळ आहे. खरं तर ते दोघे माझे अत्यंत आवडीचे नट आहेत. अर्थातच या दोघांची जोडी आहे. मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळतंय म्हणजे आता काय होणार आहे, याचा अंदाज तुम्हीच लावा. सराव करीत आहोत. थोडा तणावसुद्धा आहे. या दोघांना बघता, मला त्यांची एनर्जी मॅच करता येईल की नाही, हा प्रश्न आहे.

या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी या तिघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. तर, अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी “खूप दिवसांनी गौरव आणि ओंकारला सोबत बघायला मिळणार”, “खूपच सुंदर, गौरवदादा आणि ओंकारदादाची जोडी पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार. या जोडीला खूप खूप शुभेच्छा”, “किती आनंद झाला एकत्र पाहून”, असे म्हणत या कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, आता हे कलाकार झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात काय धुमाकूळ घालणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.