गेल्या वर्षभरात मराठी कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी व्यवसाय क्षेत्रात पदापर्ण केले आहे. अनघा अतुल, तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे अभिनेता निरंजन कुलकर्णी, महेश मांजेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे यांनी आपले स्वत:चे व्यवसाय सुरु केले आता यामध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा समावेश झाला आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून श्रेया बुगडे आहे. श्रेया मराठी मनोरंजनक्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. चला हवा येऊ द्या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया घराघरांत पोहचली. आता अभिनयाबरोबर श्रेयाने हॉटेल क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिने नुकतेच मुंबईतील दादरमध्ये आपले स्वत:चे रेस्टॉरंट उघडले आहे. ‘द फिश बिग कंपनी’ असे तिच्या नव्या रेस्टॉरंटचे नाव आहे.
सोशल मीडियावर श्रेयाच्या या नव्या रेस्टॉरंटचे फोटो व व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायर झाले आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच श्रेयाच्या या नव्या रेस्टॉरंटचा उद्धाटनसोहळा पार पडला. हॉटेलच्या नावावरुन या रेस्टॉरंटमध्ये खवय्यांना माशांचे वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या नव्या व्यवसायानंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांकडून श्रेयावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
श्रेयाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने मनोरंजनसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. कॉमेडी क्वीन’ म्हणूनही तिला ओळखले जाते. नाटक, मालिका चित्रपटांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. आता अभिनयाबरोबर श्रेय़ाने व्यवसाय क्षेत्रातही पाऊल टाकले आहे.